ज्येष्ठ गायिका डॉ अलका देव मारुलकर यांचा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराने सन्मान
पुणे दि. ९ मार्च, २०२३ : ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ यावर्षी डॉ अलका देव मारुलकर यांना प्रदान करीत गानसरस्वती महोत्सवात आज त्यांचा सन्मान करण्यात आला. तर ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी ४ व ५ मार्च दरम्यान ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त दाजीशास्त्री पणशीकर, किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर आदी यावेळी उपस्थित होते. रोख रु. ५१ हजार व मानचिन्ह असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे तर रोख रु. २५ हजार व मानचिन्ह असे किशोरी आमोणकर संगतकार पुरस्काराचे स्वरूप असून सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता सदर पुरस्कार देण्यात येतात.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ओंकार गुलवाडी यांनी पुरस्कार आपल्या गुरुंना समर्पित करीत आयोजकांचे आभार मानले. तर डॉ अलका देव मारुलकर यांनी किशोरीताई आणि त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मोगुबाई आणि माझे वडील राजाभाऊ देव यांचे चांगले ऋणानुबंध होते. मोगुबाई यांना त्यावेळी स्मृतीभ्रम झाला होता, त्यामुळे त्या आम्हाला ओळखतील की नाही हे सांगता येत नाही असे किशोरीताई यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवले होते. मात्र आम्ही केवळ त्यांच्या दर्शनासाठी गेलो. पण खोलीत पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांनी बाबा आणि मला ओळखले. माझा रियाज कसा चालू आहे याचीही विचारपूस त्यांनी केली. यावरून जन्म जन्मांतरीच्या नात्यांवर आमचा विश्वास बसला.” मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाने आज मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा असून या दोन्ही कलाकारांवर केलेली स्वरचित राग श्री मधील ‘कैसे बरनू तुम्हरी महिमा…’ ही बंदिश त्यांनी उपस्थितांसमोर म्हटली.
महोत्सवाच्या तिसऱ्या सत्राच्या पूर्वार्धात गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या बंगळूरूस्थित शिष्या विदुषी संगीता कट्टी यांनी आपले गायन सादर केले. त्यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाला सुरुवात केली. आज मला गानसरस्वती महोत्सवात माझे गाणे सादर करायची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असे कट्टी म्हणाल्या. संगीता कट्टी यांनी राग भीमपलासमध्ये ‘ रे बिरहा…’ ही पारंपरिक विलंबित तीन तालातील आणि ‘ रंग सो रंग मिलायें…’ ही किशोरीताईंची एकतालातील बंदिश प्रस्तुत केली. ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल…’ या अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अश्विनी पुरोहित, श्रीनिधी देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. यानंतर पद्मश्री शुभा मुदगल यांचे गायन झाले. आमच्या सर्वांच्या श्रद्धेय आणि सिद्ध गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने सुरू असलेल्या या महोत्सवात मला गायची संधी दिली त्याबद्दल मी रघुनंदन पणशीकर यांची आभारी आहे असे सांगत शुभा मुदगल यांनी राग पुरीया धनाश्रीने आपल्या गायनाला सुरुवात केली. पूरीया धनाश्रीमध्ये त्यांनी ‘बल बल जाऊं…’ ही बंदिश आणि ‘ देखी तोरी आन बान… ‘ ही द्रुत एकताल मधील रचना प्रस्तुत केली. ‘लाल की होली खेलन आओं री…’ या रचनेने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अनिष प्रधान (तबला), सुधीर नायक (संवादिनी), कोमल गुरव, श्वेता देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. त्यानंतर फारुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक अनिन्दो चॅटर्जी यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी रूपक तालात काही रचना सादर केल्या. यांनतर त्यांनी आपल्या गुरूंच्या तीनतालातील रचना प्रस्तुत केल्या. याबरोबरच फारुखाबाद घराण्याच्या रचना व काही जुन्या गत त्यांनी वाजविल्या. त्यांना फारुख लतीफ खान यांनी सारंगीची साथ केली.
यानंतर पं रघुनंदन पणशीकर यांचे गायन झाले. त्यांनी संपूर्ण मालकंसने आपल्या गायनाला सुरुवात केली. राग मालकंसमध्ये त्यांनी ‘ बरज रही… ‘ आणि ‘बनवारी श्याम मोरे…’ या रचना प्रस्तुत केल्या. यानंतर त्यांनी राग मालीगौरा मध्ये ‘दरस सरस…’ ही बंदिश सादर केली. यांनतर त्यांनी ‘ ए री नींद न आयें… ‘ ही राग रायसा कानडा मधील बंदिश सादर केली. उपस्थितांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘ बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हा अभंग गायला. ‘अवघा रंग एक झाला, रंग रंगला श्रीरंग..’ या भैरवीने त्यांनी आपल्या गायनाचा आणि ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सौरभ काडगावकर, अश्विनी पुरोहित, राधिका जोशी, शुभम खंडाळकर, विनय रामदासे यांनी स्वरसाथ व तानपुरासाथ केली. विघ्नेश जोशी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी