पुणे, 10/03/2023: युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च २०२३ रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंग व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, महिला उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाठ आदी उपस्थित होते.
मितेंद्र सिंग म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन स्वराज्याची चेतना वेगळ्या स्वरूपात प्रत्येक युवकाच्या मनात जागवणे हे युवक काँग्रेसचे ध्येय आहे. युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढाईत राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होणार असून, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. भारताच्या तरुणांना प्रायवेट लिमिटेडमध्ये सीमित करण्याच्या मोदी-अडानी युतीच्या षडयंत्राला जाब विचारण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.”
कुणाल राऊत म्हणाले, राज्य सरकारचे युवकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महाभरती, एमपीएससी यासोबतच विद्यार्थी आणि युवकांबद्दल राज्य सरकार चुकीची धोरणे राबवित आहे. महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. परिणामी बेरोजगारी वाढत आहे. इतर राज्यांत बेरोजगार भत्त्याची तरतूद आहे. ही तरतूद महाराष्ट्रातही व्हायला हवी. पण महाराष्ट्र सरकारचे बेरोजगारांसाठी धोरणच नाही. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात युवकांसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही. केवळ जनतेकडून करवसुली करायची, हेच सरकारचे धोरण दिसते.”
सोनलक्ष्मी घाग म्हणाल्या, “राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री नाही. त्यामुळे महिलांचे प्रतिबिंब बजेटमध्ये दिसत नाही. भाजप केवळ बेटी बचाव बेटी पढाव अशा घोषणा देते परंतु प्रत्यक्षात त्याच्या विरोधी काम करते हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
या आंदोलनासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृतीसाठी फिरणार आहेत. युवक काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही केंद्र शासनाच्या धोरणे, महाराष्ट्र सरकारचा नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प याबद्दल टीका केली. शिवराज मोरे यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली. दीपक राठोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी