November 11, 2024

पुणे: मोटारचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला फरफटत नेले

पुणे, २५/०३/२०२३: खडकीतील रेल्वे भुयारी मार्गातून भरधाव वेगाने निघालेल्या मोटारचालकावर कारवाई करणाऱ्या मुजोर मोटारचालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून खडकी पोलिसांनी मोटारचालक तरुणास अटक केली आहे.

याबाबत वाहतूक पोलीस कर्मचारी गणेश शिवाजी राबाडे (वय ३३) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राबाडे यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी मोटारचालक सूरज भारत जाधव (वय २९, रा. चंचला बिल्डींग, मामुर्डी, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे. सूरज याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, दुखापत करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई गणेश राबाडे खडकी वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. राबाडे आणि त्यांचे सहकारी विजय आढारी खडकीतील रेल्वे भुयारी मार्ग परिसरात वाहतूक नियमन करत होते.

खडकीतील मेट्रोच्या कामामुळे या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मोटारचालक सूरज जाधव भरधाव वेगाने निघाला होता. भुयारी मार्ग परिसरात पोलीस कर्मचारी राबाडे आणि आढारी यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जाधवने मोटार दोघांच्या अंगावर घातली. प्रसंगावधान राखून राबाडे मोटारीच्या बोनेटवर चढले. त्यानंतर मोटारचालक जाधवने मोटार पुढे नेली. पोलीस कर्मचारी राबाडे यांना काही अंतर फरफटत नेले. राबाडे यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथून निघालेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. नागरिकांनी मोटारचालक जाधव याला अडवले. मोटारीचा अचानक ब्रेक दाबल्याने राबाडे बोनेटवरुन पडले. त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली.

मोटारचालक जाधवला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.