July 24, 2024

श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून 284 खेळाडू सहभागी

पुणे, 15 फेब्रुवारी 2023: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल महाराष्ट्र खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून एकूण 284 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा अश्वमेध हॉल, कर्वेरोड, पुणे येथे दि.18 व 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे.
 
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा फिडे, एआयसीएफ, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होणार असून स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण 160000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये विजेत्याला 50000रुपये, उपविजेत्याला 25000रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 15000रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी नमूद केले.
 
स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणांहून 284 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये 161 रेटेड खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्या फेरीपासून बिगरमानांकित खेळाडूंना मानांकित खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार असून यामुळे मानांकनात सुधारणा करता येणार आहे. स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये आयएम कृष्णतर कुशागर(2310,महा), आयएम मोहम्मद नुबेरशहा शेख(2310, महा), आयएम अमेय औदी(2309, गोवा), आयएम सम्मेद शेटे(2308, महा), आयएम अभिषेक केळकर(2256, महा), एफएम सुयोग वाघ(2251, महा), एफएम रित्विज परब(2248, गोवा), आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(2242, महा) यांचा समावेश असल्याचे कुंटे यांनी सांगितले.