September 13, 2024

दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेस 1जून पासुन प्रारंभ

नागपूर, 31 मे 2023: नागपूरमधील नैवेद्यम नॉर्थस्टार संकुलात येत्या 1 ते 9 जून दरम्यान अव्वल दर्जाच्या चार बुद्धिबळ स्पर्धा रंगणार असल्यामुळे येथील बुद्धिबळ शौकिनांसाठी ही एक मेजवानीच ठरणार आहे. यातील पहिली स्पर्धा 2000एलो रेटिंगखालील खेळाडूंसाठी राज्य बुद्धिबळ महोत्सव अशी असून, दुसरी स्पर्धा 1600 एलो रेटिंगखालील खेळाडूंसाठी खुली असणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे दुसरे सत्र येथे पार पडणार असुन अखेरच्या स्पर्धेत स्थानिक गुणवान खेळाडू ग्रँड मास्टर रौनक साधवाणी पुढे माजी जागतिक आव्हानवीर ग्रँडमास्टर नायजेल शॉर्टचे आव्हान असून दुसऱ्या लढतीत ग्रँड मास्टर विदित गुजराथी विरुध्द ग्रँड मास्टर पीटर स्विडलर यांच्यात लढत रंगणार आहे. 
 
यातील ग्रँड मास्टर दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 16 ग्रँड मास्टर खेळाडूंचा सहभाग असून या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना ग्रँड मास्टर किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर यासाठीचे नॉर्म पुर्ण करण्यास मदत होणार आहे. यातील चॅलेंज स्पर्धेमुळे जागतिक दर्जाच्या खेळाडूंना कडवी झुंज देऊन बहुमोल अशा विजेतेपदासह ग्रँड मास्टर नॉर्म मिळवण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. 
 
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके यावेळी म्हणाले की, भारतातील बुद्धिबळ संस्कृतीचा विकास करुन राज्य भरात बुद्धिबळाची लोकप्रियता उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबई आणि पुणे येथे पहिल्या दोन स्पर्धा आयोजित केल्यानंतर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नागपूरची निवड स्वाभाविकच होती. 
 
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे म्हणाले की, आम्हाला या स्पर्धांमध्ये 15पेक्षा अधिक देशांचा आणि 85 अव्वल खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. परदेशातील स्पर्धा खेळणे ज्या खेळाडूंना शक्य नाही. त्यातून उदयोन्मुख खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परदेशातील स्पर्धा आर्थिक अडचणींमुळे शक्य नसलेल्या खेळाडूंनाच या स्पर्धांमध्ये परदेशी खेळाडूंशी सामना करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच रौनक आणि विदित गुजराथी यांना पीटर स्विडलर किंवा नायजेल शॉर्ट यांच्याशी खेळण्याची संधी मिळणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
सध्या 18 वर्षाचा असलेल्या रौनक साधवानीने वयाच्या केवळ 13व्या वर्षी ग्रँड मास्टर किताब पटकावला होता. 
 
सध्या रौनकला भारतात अकरावे मानांकन असुन त्याचे जागतिक गुणांकन 2627 असे आहे. चेन्नई मध्ये झालेल्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत रौनकने भारत अ संघाला कांस्यपदक मिळवून दिले होते. ही स्पर्धा आगळवेगळी असुन रौनकच्या तिप्पट वयाचा शॉर्ट हा प्रतिस्पर्धी असताना त्यांना मिळणारी संधी व अनुभव बहुमोल ठरणार आहे. रौनक आणि शॉर्ट यांच्यातील लढत चार क्लासिकल बुद्धिबळाचे सामने, चार रॅपिड बुद्धिबळ लढती आणि आठ ब्लिटस लढतींचा समावेश आहे. 
 
यावेळी रौनक म्हणाला की, अशी संधी खरोखरीच दुर्मिळ असुन सामन्याच्या निकालाचे दडपण न घेता. मी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. 
 
28 वर्षीय विदित गुजराथी हा 2700 एलो रेटिंग असलेला खेळाडू असुन सध्या तो राष्ट्रीय मानांकन यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्विडलर हा रशियाचा आठ वेळचा राष्ट्रीय विजेता असून तसेच असंख्य ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सहभाग घेणारा अशी त्याची ख्याती आहे. गेल्या महिन्यापासून स्विडलर चांगलाच फॉर्ममध्ये असुन त्याने नुकतीच टेपे साईमन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. त्याने गॅरी कास्पारोव्ह आणि वाल्दीमार क्रामनिक या माजी जगज्जेत्या खेळाडूंशी बरोबरी साधली आहे. बुद्धिबळातून जवळजवळ निवृत्ती घेणाऱ्या स्विडलरने केवळ महिन्या भराच्या सरावा नंतर ही स्पर्धा जिंकून आपले कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले आहे तरी सुद्धा स्विडलरला पराभूत करण्याचा निर्धार विदितने केला आहे. मी या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करण्याचा निश्चय केला असुन पटावर कोणतीही सरस स्थिती मिळवता आल्यास त्याचे विजयात रूपांतर करण्याचा निर्धार असल्याचे विदित याने सांगितले.