July 24, 2024

पुणे: चित्रीकरणासाठी निघालेल्या सहकलाकारांना लुटणारे चोरटे गजाआड

पुणे, ३०/०५/२०२३: चित्रीकरणासाठी निघालेल्या सहकलाकरांना धमकावून लुटणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपूर्वी बी. टी. कवडे रस्त्यावर ही घटना घडली होती.

स्वप्नील दादा कोतवाल (वय २३, रा. शिंदे वस्ती, हडपसर), महेश बबन गजेसिंह (वय २९, रा. भीमनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका सहकलाकाराने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तक्रारदार आणि त्यांचे दोन सहकारी कलाकार निघाले होते. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर पहाटे चारच्या सुमारास ते बसची वाट पाहत थांबले होते. तेथील एका टपरीवर ते चहा पित होते. त्या वेळी आरोपी कोतवाल, गजेसिंह तेथे आले. त्यांनी तिघा सहकलाकारांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासाद्वारे पसार झालेले आरोपी कोतवाल, गजेसिंह यांचा माग काढून त्यांना पकडले. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप शिवले, उपनिरीक्षक संतोष सोनवणे, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अतुल गायकवाड, अमजद पठाण, विनाेद भंडलकर आदींनी ही कारवाई केली.