September 14, 2024

पुणे परिमंडलामध्ये ४० हजारांवर, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. २१ मार्च २०२३: वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

दरम्यान पुणे परिमंडलातील ६ लाख ६ हजार ५६८ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १३२ कोटी ८९ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे शहरातील २ लाख ६५ हजार ३५८ ग्राहकांकडे ४४ कोटी ७८ लाख आणि पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख २८ हजार ५ ग्राहकांकडे ३३ कोटी ८ लाख रुपये तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील २ लाख १३ हजार २०५ ग्राहकांकडे ५५ कोटी ३ लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे.

महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीज खरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा सर्व खर्च वीजबिल वसूलीवरच अवलंबून आहे. मात्र वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला. यात गेल्या दीड महिन्यात ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे शहरातील २७ हजार ८४, पिंपरी चिंचवड शहरातील ७ हजार ४४ तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील ६ हजार ७८७ थकबाकीदारांचा समावेश आहे.

थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार परिमंडलात दौरे करून उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोहोंविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात शनिवारी व रविवारी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.