July 27, 2024

सहकारमंत्र्यांचा सचिव असल्याच्या बतावणीने बड्या, उद्योगसमुहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाख रुपयांचा गंडा

पुणे, ०४/०५/२०२३: महाविकास आघाडी सरकारमधील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा सचिव असल्याच्या बतावणीने बड्या उद्योग समुहातील निवृत्त अधिकाऱ्याला ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एका खासगी बँकेकडून देण्यात आलेले गृहकर्ज कमी करुन देतो, अशी बतावणी करुन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

गगन रहांडगळे (रा. नागपूर), गोरख तनपुरे, विशाल पवार (रा. हडपसर) अशी गुन्हा दाखळ करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका निवृत्त अधिकाऱ्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त झाले आहेत. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. त्यांनी २०१३ मध्ये तीन कोटी ६० लाख रुपयांना एका बंगल्याची खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. काही कारणांमुळे त्यांचे हप्ते थकले होते. त्यामुळे त्यांनी बंगल्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. करोना संसर्गात त्यांना बंगल्याची विक्री करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यांची जागा खरेदी विक्री करणारा दलाल गोरख तनपुरे याच्याशी ओळख झाली होती. तेव्हा त्याने मेहुणा विशाल पवारच्या मार्फत बंगल्याची विक्री करुन देतो, असे सांगितले होते. त्यासाठी २५ लाख रुपये कमिशन द्यावे लागेल, असे त्याने सांगितले होते.

२०२१ मध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने घरावरील जप्ती तसेच लिलाव रोखण्यासाठी तातडीने चार कोटी ८० लाख रुपये भरायचे होते. त्यामुळे त्यांनी बँकेकडे कर्जाचे हप्ते कमी करण्याची विनंती केली होती. त्या वेळी आरोपी गोरखने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा सचिव परिचयाचा असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर आरोपी गगन रहांडगळेला ऑनलाइन पद्धतीने दहा लाख रुपये पाठविण्यात आले. आरोपी गोरखने त्यांच्याकडून खर्चासाठी ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा २५ लाख रुपये घेण्यात आले. रहांडगळेने त्यांच्याकडे सहकार मंत्र्यांचा सचिवाची ओळख असल्याचे सांगितले. ते तुम्हाला बंगला परत मिळवून देतील, असे सांगून ३० लाख रुपये घेतले. त्यांना मुंबईला बोलावून घेतले.

मुंबईतील एका तारांकित हाॅटेलमध्ये त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. संशय आल्याने त्यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला. रहांडगळेच्या विरुद्ध नागपूरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.