पुणे, दि. २५ एप्रिल २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून सुनील काकडे यांनी शुक्रवारी (दि. २५) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांची संचालक (मानव संसाधन) म्हणून थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता काकडे यांची पुण्यात बदली झाली आहे.
काकडे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असलेले काकडे १९९७ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळामध्ये सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. सन २००६ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या पदावर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. तर २०१७ पासून पदोन्नतीने अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी कल्याण, अहिल्यानगर, भांडूप येथे काम केले.
काकडे यांची डिसेंबर २०२२ मध्ये मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली व भांडूप परिमंडलात कार्यरत होते. आता पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांची बदली झाली आहे.
पुणे परिमंडलामध्ये ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार तत्पर ग्राहकसेवा तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासोबतच महावितरणच्या महसूलवाढीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे काकडे यांनी सांगितले.

More Stories
पुणे गणेशोत्सव २०२६ : विसर्जनापूर्वी १,५०० हून अधिक ढोल-ताशा वादकांना ‘संजीवनी’चे सीपीआर प्रशिक्षण
२० बाय २० फुटांच्या रांगोळीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा
सिटीप्राईड सिनेमागृहाला ११.२० लाखांचा दंड! विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याचो प्रकरण भोवले