पुणे, १७ सप्टेंबर २०२६ : पुण्यातील सातारा रस्त्यावरील नामांकित ‘सिटीप्राईड मल्टीप्लेक्स’ प्रशासनाला विनापरवाना आणि मान्य आकारमानापेक्षा जास्त मोठ्या मापाचे चित्रपट जाहिरात बोर्ड उभारणे चांगलेच महाग पडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या आकाशचिन्ह विभागाने नियमबाह्य जाहिरात बोर्डांवर कारवाई करत सिनेमागृह व्यवस्थापनाला तब्बल ११ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काँग्रेस व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी यासंदर्भात महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत पालिकेच्या परवाना निरीक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली आणि ही कारवाई केली. आकाशचिन्ह विभागाच्या परवाना निरीक्षकांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत विविध आकारमानाचे अनधिकृत फलक विनापरवाना लावल्याचे निष्पन्न झाले.
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आणि परवाना निरीक्षकांनी सिटीप्राईड व्यवस्थापनाला नोटीस मिळताच ४ दिवसांच्या आत सुट्टीचे दिवस वगळून विहित ‘SP-7’ नमुन्यात अर्ज करून रीतसर परवाना घेण्याचे निर्देश दिले आहेत. नमुद कालावधीत परवाना न घेतल्यास नियमानुसार ५ पट अतिरिक्त दंडाची आकारणी केली जाईल, तसेच सर्व अनधिकृत नामफलक जप्त करून तो खर्च सिनेमागृह मालकाकडून वसूल केला जाईल व पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे महानगरपालिकेने दिला आहे.

More Stories
पुणे ड्रग्ज प्रकरण: काश्मीरमधील MBBS डॉक्टरसह पाच जणांना अटक; Rs ८.५ लाखांचे एमडी जप्त
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य शिबिर; ११ हजार चष्म्यांचे वाटप
राष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा