पिंपरी, २९ नोव्हेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहर स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेत सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात मोठी मोहीम राबविली. या कालावधीत महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात एकूण २८ लाख १२ हजार २०० रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, कचरा व्यवस्थापनाबाबत जबाबदारीने वागावे आणि शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यास हातभार लावावा, या उद्देशाने महापालिकेने दंडात्मक कारवाईसोबत जनजागृती उपक्रमही सातत्याने राबविले आहेत. ही संपूर्ण मोहीम महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सलगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, तानाजी नरळे, किशोर ननावरे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे, तसेच सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर वाघमारे, तानाजी दाते, शांतराम माने, राजेश भाट, किशोर दरवडे, महेश आढाव, अंकुश झिटे आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील निरीक्षक व कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.
कोणत्या उल्लंघनांवर कारवाई?
महापालिकेच्या पथकांनी खालील नियमभंगांवर दंडात्मक कारवाई केली ः
-उघड्यावर कचरा टाकणे
-ओल्या-सुक्या कचऱ्याचे विलगीकरण न करणे
-प्लास्टिक वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन
-दुकानदारांकडे दोन डस्टबिन नसणे
-सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे
याबाबत उपायुक्त (आरोग्य) डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी स्वच्छतेसंबंधी नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई पुढील काळातही सुरू राहील.”
ही मोहीम शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच नागरिकांना जबाबदार वर्तनाकडे प्रवृत्त करण्यास महत्त्वाची ठरत आहे.

More Stories
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत वाढवली
पिंपरी चिंचवडमध्ये ‘टाकाऊतून नवसृजन’; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अभिनव उपक्रम लोकप्रिय
पिंपरी चिंचवड: आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!