पुणे, २० जानेवारी २०२६: आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड उत्साहात आज सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांनी सायकलपटूंना प्रोत्साहन दिले.
पहिल्या टप्प्याचे एकूण अंतर ९१.८ किलोमीटर असून, मार्ग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मुळशी व मावळ तालुक्यातील घाट-वळण रस्त्यांवरून जातो. मार्गावरील तीव्र वळणे, चढ-उतार आणि अरुंद रस्त्यांमुळे सायकलपटूंना गती, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याची कस लागली. मार्गक्रमण माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे सुमारे ४ वाजता पूर्ण झाले.
जिल्हा प्रशासनाने या टप्प्यासाठी व्यापक तयारी केली होती. मार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सुविधा सुनिश्चित करण्यात आल्या. पोलिस प्रशासनासह विविध विभागांचे अधिकारी संपूर्ण मार्गावर तैनात होते, तर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून सातत्याने मार्गाचे निरीक्षण करण्यात आले.
स्पर्धेदरम्यान सायकलपटूंनी घाट-वळणाच्या रस्त्यांवर वेग आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुकास्पद प्रदर्शन केले. मार्गावरील ठराविक ठिकाणी रिफ्रेशमेंट पॉइंट्स, वैद्यकीय मदत आणि तांत्रिक सहाय्याची सोय करण्यात आली होती. समारोपस्थळी विजयी आणि आघाडीवर असलेल्या सायकलपटूंनी माध्यमांशी संवाद साधताना पुण्यातील मार्ग, निसर्गसौंदर्य आणि प्रेक्षकांचा उत्साह अविस्मरणीय असल्याचे व्यक्त केले.
या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे पर्यटनक्षम स्थळे जागतिक स्तरावर पोहोचतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि तरुणांना क्रीडा व पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रशासनाने सांगितले. पहिल्या टप्प्याच्या यशस्वी पार पडल्यामुळे आगामी टप्प्यांबाबत सायकलप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ठळक बाबी:
-हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्रातील युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती, प्रचंड उत्साह आणि उत्सुकता दिसली.
-पालक आपल्या लहान मुलांसह उपस्थित होते; मुले स्वतःच्या सायकलसह खेळाडूंना प्रोत्साहन देत होती.
-टी.सी.एस. चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व किल्ल्याची भव्य प्रतिकृती नागरिकांचे विशेष आकर्षण ठरली.
-मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण पाहून नागरिकांनी स्पर्धा प्रत्यक्ष अनुभवली.
-जागतिक स्तरावरील स्पर्धेमुळे पुण्याचे नाव क्रीडा नकाशावर अधोरेखित होणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय