पुणे, २३ जानेवारी २०२६: ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या असून, त्याबद्दल केंद्र सरकारसह देश-विदेशातील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर अधोरेखित झाले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे ‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याला झेंडा दाखवून औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या (युसीआय) महासंचालक अमिना लानाया, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, अभिनेता आमिर खान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बजाज ऑटोचे कर विभागाचे उपाध्यक्ष चेतन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ‘बजाज पुणे ग्रँड टूर’चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवक, युवती, महिला, शेतकरी, विद्यार्थी अशा सर्व घटकांचा सहभाग या स्पर्धेत दिसून आला. यापूर्वीही पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांना पुणेकरांनी भरभरून पाठिंबा दिला आहे.
भारताला आगामी ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असून, क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. भविष्यात राज्यात व देशात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रक्षा खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकार व जिल्हा प्रशासनाने ‘पुणे ग्रँड टूर’चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आनंद वाटतो. ‘विकसित भारत–२०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेत क्रीडा क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असून, देश क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. क्रीडा क्षेत्राला ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शासन व प्रायोजकांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेमुळे क्रीडा पर्यटनाला चालना मिळून भारत जागतिक क्रीडा पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी अभिनेता आमिर खान यांनीही ‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
दरम्यान, जर्मनीचे सायकलपटू बेंडकी बेकर यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी असलेले बेकर या स्पर्धेनंतर सायकलिंगमधून निवृत्त होत असल्याने आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय