March 3, 2026

अनुभवी गणेश बिडकरांकडे भाजपच्या गटनेतेपदाची जबाबादीर

पुणे, ३० फेब्रुवारी २०२६ : पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक आणि नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीचे प्रमुख गणेश मधुकर बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुणे शहरप्रमुख धीरज घाटे यांना यासंदर्भातील अधिकृत पत्र पाठवले आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत ११९ नगरसेवक निवडून आणले आहेत. या यशामागे निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बीडकर यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवत गटनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.

गणेश बीडकर हे २००२ पासून सातत्याने पुणे महानगरपालिकेत निवडून येत असून, ते शहरातील भाजपच्या ज्येष्ठ व प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. भाजपासाठी प्रतिकूल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात त्यांनी काँग्रेसच्या गटनेत्यासह तत्कालीन महापौरांचा पराभव करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. पूर्व पुण्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

गेल्या ३० वर्षांपासून ते पक्ष संघटनेत सक्रिय असून, प्रभाग पातळीपासून शहर पातळीपर्यंत विविध महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. भाजपचे शहर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जनादेश यात्रा’ची प्रमुख जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

त्यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव बीडकर हेही पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे सार्वजनिक जीवनाचा वारसा पुढे नेत गणेश बीडकर यांनी महापालिकेतील विविध समित्यांमध्ये नेतृत्व केले आहे.

भूषविलेली महत्त्वाची पदे :

२००९–२०१० : अध्यक्ष, कसबा पेठ प्रभाग समिती

२०१०–२०११ : अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

२०११–२०१२ : अध्यक्ष, स्थायी समिती

२०१४–२०१७ : गटनेता, भारतीय जनता पार्टी

२०२०–२०२२ : सभागृह नेता, पुणे महानगरपालिका