पुणे, ३० जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले असून, या संख्याबळाच्या जोरावर पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पुण्याचे निरीक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची स्वतंत्र भेट घेऊन गटनेतेपदासाठी कल जाणून घेतला होता. त्यावेळीच कदम यांच्या नावाला एकमताने संमती मिळाली होती.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ॲड. चंदूशेठ कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांकडे अधिकृत पत्र सादर केले.
कोथरूड—भाजपचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ—याच भागातून गेली १५–२० वर्षे चंदूशेठ कदम ‘नॉटआऊट’ बॅटिंग करत आहेत, ही बाब राजकीय वर्तुळात विशेष लक्षवेधी ठरत आहे. भाजपच्या प्रचंड ताकदीसमोरही कधी न झुकता, कधी न डगमगता त्यांनी कोथरूडमध्ये काँग्रेसचा गड टिकवून ठेवला आहे.
२००७ साली पुणे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. कामाच्या जोरावर मिळवलेला जनाधार, लोकांशी जोडलेले जिव्हाळ्याचे नाते आणि सातत्यपूर्ण उपस्थिती यामुळे २०१२ मध्ये त्यांनी थेट निवडणुकीत मोठा विजय मिळवला. एवढ्यावरच न थांबता २०१७ आणि आता २०२६ मध्येही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती करत आपले नेतृत्व सिद्ध केले.
शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, कामगार योजना, कोरोनाकाळातील ५ हजार महिलांचे मोफत लसीकरण, विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच कोथरूडमधील नागरिक त्यांना प्रेमाने ‘आपलं चंदूशेठ’ म्हणतात.
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची पताका उंचावणारे, विचारांशी तडजोड न करणारे आणि लोकांच्या विश्वासावर उभे राहिलेले नेतृत्व म्हणून चंदूशेठ कदम यांची गटनेतेपदी निवड ही केवळ पक्षीय नियुक्ती नसून, भाजपसमोर काँग्रेसचे आक्रमक आव्हान असल्याचे मानले जात आहे.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय