लोणावळा, 2 फेब्रुवारी २०२६ – टायगर पॉईंट–ड्युक्स नोज परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा दरीत पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. मुंबईहून ट्रेकसाठी आलेली श्रेया पाटील (वय १९) ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी टायगर पॉईंट परिसरात तिची बॅग सापडल्यानंतर शोधमोहीमेला वेग आला.
लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सूचनेनुसार शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दरीत धोकादायक शोधमोहीम हाती घेतली. दोरी, टॉर्च, स्ट्रेचर आणि ड्रोनच्या मदतीने तब्बल ३९० फूट खोल दरीत शोध सुरू असताना सायंकाळी ४.४५ वाजता ड्रोन कॅमेऱ्यात तरुणीचा मृतदेह आढळून आला. अंधार, दगडधोंडे आणि अरुंद उतार यामुळे ऑपरेशन अत्यंत जोखमीचे ठरले.
रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत मृतदेह सुरक्षितपणे वर काढला. रात्री ९.३० वाजता मृतदेह पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्या, अपघात की घातपात, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या संपूर्ण थरारक मोहिमेत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गील, उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे, लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. लोणावळ्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन