March 3, 2026

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; पुणे–पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना

पुणे, १० फेब्रुवारी २०२६: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दूरगामी परिणाम करणारा असल्याचे सांगत पुण्याचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मोहोळ म्हणाले, “वाढती हवाई संपर्क व्यवस्था उद्योग, आयटी क्षेत्र, पर्यटन तसेच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदर विमानतळ हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय ठरणार असून वाढत्या प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेला मोठी चालना मिळेल.”

त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकल्पामुळे मध्य पूर्व, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मार्गांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होईल. यामुळे निर्यात वाढ, परकीय गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय संधींसाठी नवी दालने खुली होतील.

पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळेल. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि गुंतवणूक वाढ होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून पुरंदर विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.