March 3, 2026

आगामी उत्सव कालावधीत १५ दिवस ध्वनीक्षेपक वापरास शिथिलता; सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत परवानगी

पुणे, १३ फेब्रुवारी २०२६: आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापरासाठी १५ दिवसांची विशेष शिथिलता देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे. केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ मधील तरतुदीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशानुसार संबंधित उत्सवांच्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी राहील.

या उत्सवांसाठी परवानगी लागू :
-शिवजयंती – १९ फेब्रुवारी
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल
– महाराष्ट्र दिन – १ मे
– गणपती उत्सव
– ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी – १९, २०, २२, २३, २४ व २५ सप्टेंबर (६ दिवस)
-नवरात्री उत्सव – १९ व २० ऑक्टोबर
– नाताळ (ख्रिसमस) – २५ डिसेंबर
– वर्षअखेर – ३१ डिसेंबर
– तसेच दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी राखीव

आवश्यकतेनुसार संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

अटी व मर्यादा:
-निर्धारित ध्वनी मर्यादा (झोननिहाय) ओलांडता येणार नाही.
-शांतता क्षेत्रात (रुग्णालय, शैक्षणिक संस्था आदी परिसर) ही सूट लागू राहणार नाही.
– नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आयोजक व संबंधित यंत्रणांवर राहील.

जिल्हाधिकारी डूडी यांनी नागरिक व आयोजकांना आवाहन केले आहे की, नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि उत्सव शांततेत व सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडावेत.