March 3, 2026

पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत इल्या इवाश्काचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

पुणे, 23 फेब्रुवारी 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत पहिल्या फेरीत इल्या इवाश्का याने अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला. तर, अंतिम पात्रता फेरीत भारताच्या एस डी प्रज्वल देव, दिग्विजयप्रताप सिंग यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्ठात आले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल 50 मधील माजी खेळाडू इल्या इवाश्का याने अर्जेंटिनाच्या अव्वल मानांकित फेडेरिको ऑगस्टिन गोमेझचा टायब्रेकमध्ये 6-1, 1-6, 7-6(7) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. हा सामना 2 तास 25 मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये इवाश्का याने गोमेझची चौथ्या, सहाव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या गोमेझने इवाश्काची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सामन्यात 4-4 अशी बरोबरी असताना इवाश्का याने गोमेझची आठव्या गेममध्य सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत 5-4 अशी आघाडी मिळवली. पण हि आघाडी फार काळ त्याला टिकवता आली नाही. अकराव्या गेममध्ये गोमेझने इवाश्काची सर्व्हिस भेदली व बरोबरी साधली. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये इवाश्का याने जोरदार खेळ करत गोमेझविरुद्ध हा सेट 7-6(9-7) असा जिंकून विजय मिळवला.

जपानच्या युटा शिमिझू याने इटलीच्या लोरेन्झो कार्बोनीचा 6-4, 6-4 असा कडवा प्रतिकार केला. ग्रेट ब्रिटनच्या ॲलिस्टर ग्रे याने पोलंडच्या डॅनियल मिकाल्स्कीचा 6-3, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. क्रोएशियाच्या दुजे अजदुकोविकने कोरियाच्या सान्हुई शिनला 6-2, 6-4 असे पराभूत केले.

अंतिम पात्रता फेरीत जपानच्या सातव्या मानांकित ताकुया कुमासाकाने भारताच्या एस डी प्रज्वल देवचे आव्हान 6-4, 6-2 असे मोडीत काढले. दुसऱ्या मानांकित तैपेईच्या तुंग-लिन वू याने भारताच्या दिग्विजयप्रताप सिंगचा 7-5, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. जपानच्या अकराव्या मानांकित मासामिची इमामुराने स्पेनच्या तिसऱ्या मानांकित डेव्हिड जोर्डा साँचीसचा 6-4, 6-3 असा तर, मलेशियाच्या मित्सुकी वेई कांग लिओंगने तैपेईच्या आठव्या मानांकित त्सुंग-हाओ हुआंगचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली.

याआधी स्पर्धेचे उदघाटन राज्याच्या क्रीडा आयुक्त शितल तेली-उगले(आयएएस), पीएमआरडीएचे सह आयुक्त दिपक सिंगला(आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि एटीपी सुपरवायझर रोजेरिओ सॅनटोस आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी:
इल्या इवाश्का वि.वि.फेडेरिको ऑगस्टिन गोमेझ[1](अर्जेंटिना)6-1, 1-6, 7-6(7);
युटा शिमिझू (जपान)वि.वि.लोरेन्झो कार्बोनी(इटली) 6-4, 6-4;
ॲलिस्टर ग्रे (ग्रेट ब्रिटन) वि.वि. डॅनियल मिकाल्स्की(पोलंड)6-3, 3-6, 6-3;
दुजे अजदुकोविक(क्रोएशिया) वि.वि.सान्हुई शिन(कोरिया) 6-2, 6-4;

अंतिम पात्रता फेरी:
ताकुया कुमासाका[7](जपान)वि.वि. एस डी प्रज्वल देव(भारत)6-4, 6-2;
तुंग-लिन वू[2] (तैपेई) वि.वि. दिग्विजयप्रताप सिंग(भारत) 7-5, 6-4;
मॅक्स कास्निकोव्स्की[1](पोलंड)वि.वि.एगोर अगाफोनोव 6-4, 6-4;
मासामिची इमामुरा[11] (जपान)वि.वि.डेव्हिड जोर्डा साँचीस[3](स्पेन)6-4, 6-3;
मित्सुकी वेई कांग लिओंग (मलेशिया)वि.वि.त्सुंग-हाओ हुआंग [8](तैपेई)6-2, 6-3;
युसुके ताकाहाशी [10](जपान)वि.वि.अलेक्झांडर बिंडा[6](इटली)6-4, 6-3.