March 5, 2026

दरी पुलाजवळ महामार्गावर भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू, प्रवासी जखमी

पुणे, २४ फेब्रुवारी २०२६: पुणे – बंगळुरू महामार्गावर दरी पुलाजवळ मंगळवारी ( दि. २४) रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी पाईप/सळ्या असलेला एक ट्रक नवीन कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येत असताना, ट्रक समोरील एका प्रवासी बसला पाठीमागून या ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेनंतर ट्रकचा पुढील केबिन चक्काचूर झाला.

या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ट्रकचा क्लीनर लोखंडी सळ्या आणि केबिनमध्ये अडकून पडल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. अग्निशमन दलाने कटरच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक दाखल झाले असून अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटेच्या वेळीही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.