पुणे, 24 फेब्रुवारी 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत पहिल्या फेरीत भारताचा अव्वल टेनिस पटू सुमित नागल यासह महाराष्ट्राचा उभारता टेनिस पटू मानस धामणे याने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या 18वर्षीय मानस धामणे याने ग्रीसच्या स्टेफानोस साकेलारिडिसचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(4) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 50मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये मानसने स्टेफानोसची, तर दुसऱ्या गेममध्ये स्टेफानोसने मानसची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोघांनी आपल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे 4-4अशी बरोबरी झाली. नवव्या गेममध्ये मानसने जोरदार खेळ करत स्टेफानोसची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. बाराव्या गेममध्ये स्टेफानोसने मानसची सर्व्हिस रोखली व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 5-4 अशा फरकाने आघाडीवर असताना मानसने उत्कृष्ट रॅली व जोरदार परतीचे फटके लगावत हा सेट 7-4असा जिंकून सामन्यात विजय मिळवला.
भारताचा अव्वल टेनिस पटू सुमित नागलने जपानच्या सातव्या मानांकित रिओ नोगुचीचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. सुमितने रिओचे आव्हान 1 तास 9 मिनिटात मोडीत काढले. पहिल्या सेटमध्ये सुमितने आपल्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळीच्या जोरावर तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये रिओची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा सहज जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये देखील रिओला कमबॅक करण्याची फारशी संधी मिळाली नाही. सुमितने पाचव्या गेममध्ये रिओची पुन्हा एकदा सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून विजय मिळवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्स्की याने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या करण सिंगचे आव्हान 6-1, 6-2 असे मोडीत काढले.
क्वालिफायर तैपेईच्या तुंग-लिन वू याने लकी लुझर ठरलेल्या इटलीच्या अलेक्झांडर बिंदाला 6-1, 6-2 असे पराभूत केले. आठव्या मानांकित लिथुनियाच्या एडास बुटविलास याने भारताच्या आदित्य बलसेकरचा 6-0, 6-1 असा एकतर्फी पराभव केला. तिसऱ्या मानांकित इलिया सिमाकिन याने मलेशियाच्या क्वालिफायर मित्सुकी वेई कांग लिओंगचा 4-6, 6-2, 7-6(10) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. चुरशीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनच्या फेलिक्स गिल याने बेलारूसच्या मायकेल गीर्ट्सचा 1-6, 7-6(9), 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी:
एडास बुटविलास [8](लिथुनिया) वि.वि.आदित्य बलसेकर(भारत)6-0, 6-1;
फेडेरिको सिना [6](इटली)वि.वि.ताकुया कुमासाका(जपान)6-1, 6-0;
फेलिक्स गिल(ग्रेट ब्रिटन)वि.वि.मायकेल गीर्ट्स(बेलारूस) 1-6, 7-6(9), 6-4;
फ्रेडेरिको फरेरा सिल्वा [5](पोर्तुगल)वि.वि.पेट्र बार बिर्युकोव्ह 6-3, 6-4;
तुंग-लिन वू (तैपेई)वि.वि.अलेक्झांडर बिंदा(इटली)6-1, 6-2;
इलिया सिमाकिन [3]वि.वि.[प्र] मित्सुकी वेई कांग लिओंग(मलेशिया)4-6, 6-2, 7-6(10);
सुमित नागल(भारत)वि.वि.रिओ नोगुची [7](जपान) 6-1, 6-2;
मानस धामणे(भारत)वि.वि.स्टेफानोस साकेलारिडिस(ग्रीस) 6-4, 7-6(4);
ऑलिव्हर क्रॉफर्ड [4](ग्रेट ब्रिटन)वि.वि.त्सुंग-हाओ हुआंग (तैपेई)6-2, 4-6, 6-0;
मॅक्स कास्निकोव्स्की(पोलंड)वि.वि.करण सिंग(भारत)6-1, 6-2;
मासामिची इमामुरा(जपान)वि.वि.डेव्हिड जोर्डा सांचीस(स्पेन) 7-6(8), 6-4;
दुहेरी: पहिली फेरी:
युता शिमिझू(जपान)/ सीता वातानाबे[3](जपान)वि.वि.एस डी प्रज्वल देव(भारत)/ नितीन कुमार सिन्हा(भारत)6-4, 7-6(2).

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेस १ मार्चपासून सुरुवात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या मानस धामणेची विजयी आगेकूच