पुणे, २६ फेब्रुवारी २०२६: : लोहगाव परिसरातील जे. डी. गाथा सोसायटीतील रहिवाशांनी परिसरात वाढलेल्या अनधिकृत दुकानांमुळे, रात्रीच्या गोंधळामुळे आणि मारहाणीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची तक्रार केली आहे. या संदर्भात वडगाव शेरी मतदारसंघाच्या आमदारांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रहिवाशांनी दिलेल्या निवेदनानुसार, सर्वे नंबर २९६, पोडवाल रोड, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी रोडजवळील भागात बिल्डिंगसमोर अंडा भुर्जी, पान-मसाला, चायनीज, सिगारेट टपऱ्या आदी अनधिकृत दुकाने रात्रभर सुरू असतात. या दुकानांभोवती रात्री तरुणांचा जमाव होतो. दारू पिणे, मोठ्याने ओरडणे, भांडणे आणि मारहाणीच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सायंकाळी सहानंतर घराबाहेर पडण्यासही भीती वाटत असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. विरोध केल्यास ३० ते ४० जणांचा घोळका येऊन मारहाण करतो, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ पुरावे यापूर्वी पोलिसांना दिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
तसेच रात्री उशिरा २० ते २५ बुलेट मोटरसायकली सायलेन्सरचा मोठा आवाज करत फिरत असल्याने ध्वनीप्रदूषणात भर पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
रहिवाशांनी यापूर्वी स्थानिक पोलिस ठाण्यात दोन वेळा लेखी तक्रार दिली असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महानगरपालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अनधिकृत दुकाने, अतिक्रमण आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे व्यवसाय यावर कारवाई करावी, तसेच परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

More Stories
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय
Pune: ई-चलनाविरोधात ५ मार्चपासून वाहतूकदारांचे बेमुदत आंदोलन