पुणे, ६ मार्च २०२६: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर व्हावा यासाठी पुणे मेट्रोकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ मार्च २०२६ पासून, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या सर्व ट्रेनमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव आसनव्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
या नव्या उपक्रमांतर्गत मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमधील तीनही कोचमध्ये राखीव जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विशेषतः महिला आणि वृद्ध प्रवाशांना प्रवासादरम्यान बसण्यासाठी प्राधान्य मिळणार आहे.
प्रत्येक ट्रेनमध्ये ५४ जागा राखीव
पुणे मेट्रोच्या नियोजनानुसार, प्रत्येक ट्रेनमध्ये महिलांसाठी ४६ जागा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोचनुसार या जागांचे वितरण पुढीलप्रमाणे असेल:
-पहिला कोच (डीएमए कार): महिलांसाठी १४, ज्येष्ठ नागरिकांसाठी २
-मधला कोच (टी-कार): महिलांसाठी १८, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४
-तिसरा कोच (डीएमबी कार): महिलांसाठी १४, ज्येष्ठ नागरिकांसाठी २
या आसनव्यवस्थेचा सविस्तर ड्रॉईंग लेआउट पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर तसेच अधिकृत ॲपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच मेट्रोच्या डब्यांमध्ये लावलेल्या चिन्हांद्वारे (Signage) राखीव जागा स्पष्टपणे दर्शवण्यात येतील.
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना या राखीव जागांचा योग्य वापर करण्याचे आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित, सुसह्य आणि समावेशक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन