March 9, 2026

Pune: बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकाचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर

पुणे, ९ मार्च २०२६: शहरातील सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासासाठी पुन्हा एकदा पाऊल पडले आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात बालगंधर्व रंगमंदिराचे आधुनिकिकरण व पुर्नविकासाचा महत्वकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला असून अस्तित्वातील इमारत पाडून त्याजागेवर नविन तीन आधुनिक प्रेक्षागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील ऐतिहासिक व महत्वाचे नाट्यगृह म्हणून बालगंधर्व रंगमंदिराची ओळख आहे. हे नाट्यगृह १९६८ मध्ये सुरू झाले आहे. याठिकाणी मराठी नाटके, सास्कृतिक कार्यक्रमांबरोबरच राजकिय कार्यक्रमेही होतात. या नाट्यगृहाची इमारती जुनी झाल्याने ती पाडून त्याठिकाणी आधुनिक स्वरुपाची इमारत उभारून वेगवेगळी नाट्यगृह, कलादालन, खुला मंच, पार्किगची व्यवस्था उभारण्यासाठी २०१७ मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुर्नविकासाची योजना मांडली होती. मात्र, या योजनेला नाट्य क्षेत्रातील मंडळीनी विरोध केला. त्यामुळे पुर्नविकासाची योजना बारगळली. आता स्वत: महापालिका प्रशासनानेच बालगंधर्वच्या पुर्नविकासाचा प्रकल्प हाती घेतला आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांनी पुढील वर्षांच्या अंदाजपत्रकात पुर्नविकासाचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यानुसार रंगमंदिराची अस्तित्वातील इमारत पाडून त्याठिकाणी १ हजार ८०० आसन व्यवस्था असलेली ३ आधुनिक प्रेक्षागृहे, आधुनिक रंगमंच व ध्वनी-प्रकाश व्यवस्था, कलाकरांसाठी सुधारीत मेक-अप रुप व ग्रीन रुम, स्वच्छ व आधुनिक शौचालये, पाणी पुरवठा व्यवस्था, सीसी टिव्ही, प्रेक्षकांसाठी अधिक पार्किग व्यवस्था व परिसराचे सौदर्यीकरण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.