March 25, 2026

पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत रेंजहिल्स यंग बॉईज एफसी, दिएगो ज्युनियर एफसी संघांची आगेकूच

पुणे, 24 मार्च 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत दिएगो ज्युनियर एफसी, रेंजहिल्स यंग बॉईज एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.

बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चुरशीच्या लढतीत रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाने संगम स्पोर्ट्स क्लब संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात सुरुवातीलाच रेंजहिल्स यंग बॉईज संघाच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. 3ऱ्याच मिनिटाला शशांक यादवने दिलेल्या पासवर निखिल नारायणन याने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या संगम स्पोर्ट्स क्लबने जोरदार प्रतिक्रमण केले. 22व्या मिनिटाला निर्मल छेत्रीने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी जोरदार चढाया केल्या, पूर्वार्धात हि बरोबरी कायम होती.

उत्तरार्धात रेंजहिल्स यंग बॉईज संघाच्या आघाडीच्या फळीने आक्रमक खेळ सुरु केला. 68व्या मिनिटाला नील संघवीने दिलेल्या पासवर निखिल नारायणन याने आणखी एक गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. संगम स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी जोरदार खेळ करत गोल करण्याचा प्रयन्त केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेरपर्यंत रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाने आपली आघाडी कायम ठेवत संगम स्पोर्ट्स क्लब संघावर 2-1 असा विजय मिळवला.

दुसऱ्या लढतीत दिएगो ज्युनियर एफसी संघाने थंडरकॅट्स एफसी संघाचा 6-1 असा धुव्वा उडवला. विजयी संघाकडून चल्ला जॉन(2,3,26 मि.) याने तीन गोल, तर मिझान तांबोळी(44,50मि.) ने दोन गोल आणि गोपाल चव्हाण(57मि.)ने एक गोल केला. थंडरकॅट्स एफसीकडून ओबेड रोझारियो(32मि.) याने एक गोल केला.

निकाल: साखळी फेरी:

रेंजहिल्स यंग बॉईज एफसी: 2(निखिल नारायणन 3,68मि.) वि.वि. संगम स्पोर्ट्स क्लब: 1(निर्मल छेत्री 22मि.);

दिएगो ज्युनियर एफसी: 6(चल्ला जॉन 2,3,26 मि., मिझान तांबोळी(44,50मि., गोपाल चव्हाण 57मि.) वि.वि. थंडरकॅट्स एफसी: 1 (ओबेड रोझारियो 32मि.)