पुणे, 24 मार्च 2026: पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने व दोशी इंजिनियर्स यांच्या सहकार्याने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 28 व 29 मार्च 2026 रोजी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
याविषयी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि सह सचिव सारंग लागू, दोशी इंजिनियर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित दोशी यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित क्लबपैकी एक असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंना माजी रणजीपटू निरंजन गोडबोले, इंद्रजीत कामतेकर, पराग शहाणे आणि कौस्तुभ आफळे या अनुभवी प्रशिक्षकांतर्फे वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून पुण्यात होणाऱ्या विविध स्पर्धातही त्यांना सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे या निवड झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षक, फिजिओ, आहारतज्ञ यांचेदेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याशिवाय 16 वर्षांवरील व 19 वर्षांखालील या वयोगटातील खेळाडूंना या निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे. या निवड चाचणी संदर्भात खेळाडूंनी 28 व 29 मार्च 2026 या तारखेला सकाळी साडेआठ वाजता पीवायसीच्या मैदानावर निरंजन गोडबोले यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
तसेच, या निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना नावनोंदणी करणे बंधनकारक असून अधिक माहिती व नावनोंदणीसाठी श्री निरंजन गोडबोले, मोबाईल क्रमांक 9823023952 या क्रमांकावर अथवा https://www.pycgymkhana.com/selection या वेबसाईटवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

More Stories
२०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळची निवड
Pune: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत अभिजीत गुप्ता याला विजेतेपदाचा मान