April 10, 2026

पुण्यात १५ टक्के पाणी कपात करा, पाटबंधारेची महापालिकेला सूचना

पुणे, ८ एप्रिल २०२६ : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज लक्षात घेता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच एमआयडीसी क्षेत्रात १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे शहरावर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने २०२६ मध्ये एल-निनो (El Niño) आणि आयओडी (Indian Ocean Dipole) च्या प्रभावामुळे मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्र्यांच्या निर्देशानुसार उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. ३१ जुलै २०२६ पर्यंत पिण्याचे पाणी पुरेसे उपलब्ध राहावे आणि टंचाई टाळता यावी, यासाठी दरमहा १५ टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त*नवल किशोर राम यांनी सांगितले की, “सध्या शहरात लोकेशननिहाय पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात जास्त तर काही भागात कमी पाणी मिळत असल्याचे आढळले आहे. मात्र, योग्य नियोजन केल्यास १५ टक्के कपात करूनही नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करता येऊ शकतो.” शहरात सुमारे ३.५ लाख नळ कनेक्शन असून त्यापैकी तब्बल १.५ लाख अनधिकृत आहेत. याशिवाय पाणीगळती आणि चोरीमुळे सुमारे २५ टक्के पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. ही गळती कमी करण्यासाठी आणि अनधिकृत जोडण्या नियमित करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप ४० ते ५० हजार अनधिकृत कनेक्शनवर कारवाई बाकी आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाने ३१ मार्चपर्यंत २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जात असला तरी वितरणातील त्रुटींमुळे सर्व भागांना समान पाणी मिळत नाही. महापालिकेने ३५ झोनचा आढावा घेतला असून उर्वरित झोनचे परीक्षण सुरू आहे.

खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा :
* आज : १३.२० टीएमसी (४५.२९%)
* गेल्या वर्षी : १२.४० टीएमसी (४१.३०%)

पाणी वापराचा आढावा
सध्या पुणे महापालिका दररोज सुमारे १५६० एमएलडी पाणी उचलते. १५% कपात केल्यास हे प्रमाण सुमारे १३०० एमएलडी इतके होईल. दरमहा सध्या १.६५ टीएमसी** पाणी वापरले जाते, ते कपातीनंतर १.४ टीएमसी पर्यंत खाली येईल.

जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाची शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार असून त्यात पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे.

हवमान विभागाच्या अंजदानुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे, असा अंदाज आहे. त्यामुळे ३१ जुलै २०२६ पर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल तसेच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, यसाठी 15 टक्के पाणी कपात करण्यास सांगितले आहे. – किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला, पाटबंधारे विभाग