April 25, 2026

एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकर याला दुहेरी मुकुटाची संधी

पुणे, 24 एप्रिल 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर याने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, दुहेरीत मुलींच्या गटात जपानच्या मिकू किटाओका व युई कोमदा यांनी तर, मुलांच्या गटात भारताच्या अर्णव पापरकर व थायलंडच्या कुनानन पंताराटोर्न यांनी विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत एकेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित भारताच्या अर्णव पापरकर याने भारताच्या तविश पाहवाचा 6-1, 6-3 असा पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. हा सामना 1तास 25मिनिटे चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित जपानच्या ह्यु कावनिशी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या कोरियाच्या जुनसेओ जंगचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1तास 2मिनिटे चालला.

मुलींच्या गटात भारताच्या जेन्सी कानबर हिने जपानच्या भारताच्या सातव्या मानांकित दिया रमेशचा 6-7(5), 6-2, 6-2 असा कडवा प्रतिकार करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 2तास 13मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ केला. सहाव्या गेममध्ये दियाने जेन्सीची तर, सातव्या गेममध्ये जेन्सीने दियाची सर्व्हिस रोखली व त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली. 12व्या गेमपर्यंत बरोबरी कायम राहिल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये दियाने आक्रमक खेळ केला व हा सेट 7-6(5) असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये जेन्सीने पिछाडीवरून पुनरागमन करत दियाची पाचव्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दुसऱ्या सेटची पुनरावृती पहायला मिळाली. हा सेट जेन्सीने दियाविरुद्ध 6-2 असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात कोरियाच्या चौथ्या मानांकित सियोन सिम हिने जपानच्या मिसाकी सेकिडोचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित भारताच्या अर्णव पापरकर याने थायलंडच्या कुनानन पंताराटोर्नच्या साथीत जपानच्या दुसऱ्या मानांकित ह्यू कावनिशी व इटो कोमदा यांचा 6-2, 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत जपानच्या दुसऱ्या मानांकित मिकू किटाओका व युई कोमदा या जोडीने कझाकस्तानच्या इवा कोरीशेवा व आदिया ओमरबेक यांचा 6-3, 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक, 225आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक व 157आयटीएफ गुण देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे मानद सचिव संजय शेटे आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव डॉ. विक्रांत साने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी उपस्थित होते.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी : मुले:
अर्णव पापरकर[2] (भारत)वि.वि. तविश पाहवा(भारत)6-1, 6-3;
ह्यु कावनिशी[1](जपान) वि.वि. जुनसेओ जंग(कोरिया) 6-1, 6-1;

मुली:
सियोन सिम[4](कोरिया) वि.वि.मिसाकी सेकिडो(जपान)6-4, 6-2;
जेन्सी कानबर(भारत) वि.वि.दिया रमेश[7](भारत)6-7(5), 6-2, 6-2;

दुहेरी: अंतिम फेरी:
कुनानन पंताराटोर्न(थायलंड)/अर्णव पापरकर (भारत)[1] वि.वि.ह्यू कावनिशी (जपान) [2] /इटो कोमदा (जपान) 6-2, 7-5;

मुली:
मिकू किटाओका(जपान)/युई कोमदा (जपान)[2] वि.वि.इवा कोरीशेवा(कझाकस्तान)/आदिया ओमरबेक(कझाकस्तान) 6-3, 7-5.