पुणे, २८ जून २०२६: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीने आणि ‘द हॅबिटॅट’द्वारे प्रायोजित पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुंडवा येथे ‘द फेर्न हॅबिटॅट’ येथे ३० जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे), अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा चेस सर्कलच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्रात आयोजित केली जाणारी ही अशा प्रकारची पहिलीच आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन स्पर्धा आहे. नॉर्म मिळवण्यासाठी; तसेच अनुभवी ग्रँडमास्टर्सविरुद्ध खेळण्याची दुर्मीळ संधी या निमित्ताने बुद्धिबळपटूंना मिळणार आहे. भारत, बेलारूस, श्रीलंका आणि अमेरिकेतील खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश आहे. या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टर, सहा आंतरराष्ट्रीय मास्टर आणि एका फिडे मास्टरचा समावेश आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन ३० जून रोजी सकाळी ९:३० वाजता होईल आणि सर्व नऊ फेऱ्या दररोज सकाळी दहा वाजता सुरू होतील. यात पहिल्या चालीपासून ९० मिनिटांचा डाव असेल; तसेच ३० सेकंदांची वाढीव वेळ असेल. टाइम कन्ट्रोल पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेत एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक असून, विजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत बेलारूसच्या ग्रँडमास्टर ऍलेकसांड्राव्ह अल्कसेज(२४३३), फेडरोव्ह अलेक्सी(२३८८), भारताच्या ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता(२५४०), कुशाग्र मोहन(२४५६), अक्षय बोरगावकर(२३८०), नितीश बेलुरकर(२४७९), अद्विक अग्रवाल(२३८२), श्रीलंकेच्या डिसिल्वा एलएमएसटी(२३८२), अमेरिकेच्या वैद्यनाथन कन्नन(२३७७) हे खेळाडू झुंजणार आहेत.
या स्पर्धेचे चीफ आर्बिटर म्हणून आर. श्रीवत्सन काम पाहतील. या स्पर्धेला चेसबेस इंडिया, कुंटेज चेस अकॅडमी आणि किंडरस्पोर्ट्स यांचे सहकार्य लाभले आहे.

More Stories
नागपुरात रंगणार ७ वर्षांखालील गटाची राष्ट्रीय खुली आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा
पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत गोल डिगर्स एफसी संघाची विजयी आगेकूच
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांची आगेकूच