पुणे, २९ जुलै २०२६ : दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ला आणि प्लेलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या त्यांच्या पुणे दौऱ्याला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला.
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यानिमित्त अमित शहा पुण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर टीका केली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. प्लेलेट गनच्या वापरात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका पत्रकारालाही दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षा प्रणालीतील सुधारणांच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते. अशा वेळी त्यांचे संरक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. मात्र, मोदी सरकारने ती पार पाडली नाही. उलट दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविण्यात आल्या. दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने या कारवाईची जबाबदारी अमित शहा यांनी स्वीकारून याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी जोशी यांनी केली.
असे न झाल्यास अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावेळी काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करून निषेध नोंदविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

More Stories
नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे योगदान: विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील
अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीवर महापौर आक्रमक; पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम