August 12, 2026

एफएचएस होलिस्टिको रन स्पर्धेत अमित पाटील, नीता सलामे, अरविंद यादव, शकीला वसावे यांना विजेतेपद

पुणे, 10 ऑगस्ट 2026: फिटनेस प्रेमी, हौशी धावपटू आणि व्यावसायिक ॲथलीट्ससाठी होलिस्टिको लाईफस्टाईल यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या एफएचएस होलिस्टिको रनचे स्पर्धेत अमित पाटील, नीता सलामे, अरविंद यादव, शकीला वसावे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

पूना जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व एसपीजे स्पोर्ट्स क्लब अँड अकादमीच्या व्यवस्थापनाखाली हडपसरच्या एफएच सर्कल, बी.एस.तुपे रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 1500 धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेत 21किमी पुरुष गटात अमित पाटील याने 01.13.13 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, धीरज यादव(01.15.14से) व संदीप रामेश्वर(01.17.44से) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. 21किमी महिला गटात नीता सलामे हिने 01.35.19 सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला.

10किमी पुरुष गटात अरविंद यादवने 32 मिनिटे 44 सेकंद वेळ नोंदवत प्रथम स्थान मिळवले. तर, महिला गटात शकीला वसावेने 40मिनिटे 13 सेकंद वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील 21 किमी पुरुष आणि महिला गटातील विजेत्याला करंडक आणि 21 हजार रुपये, तर उपविजेत्याला करंडक आणि 15हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. तर, 10 किमी गटातील पुरुष व महिला विजेत्याला करंडक आणि 15हजार रुपये, तर उपविजेत्याला करंडक आणि दहा हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे माजी अध्यक्ष, पूना इंटरनॅशनल मॅरेथॉनचे संस्थापक सदस्य आणि होलिस्टिको ग्रुपचे अध्यक्ष दिलीप आबा तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सिद्दराम राऊत, होलिस्टिको ग्रुपचे कार्यकारी संचालक इंद्रजीत तुपे, होलिस्टिको ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बोडके, होलिस्टिको ग्रुपच्या विक्री आणि विपणन विभागच्या संचालिका समृद्धी खोतकर, आहुरा ग्रुपचे संचालक आयपी इनामदार आणि रेस डायरेक्टर संदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा 21 किमी (अर्ध मॅरेथॉन), 10 किमी, 5 किमी आणि 3किमी अशा गटांमध्ये पार पडली. प्रत्येक नोंदणीकृत स्पर्धकाला टी-शर्ट, कॅप, गुडी बॅग, पदक, अल्पोपहार, हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय मदत, रूटवरील मनोरंजन आणि पौष्टिक आहार देण्यात आले. एफएचएस होलिस्टिको रन २०२६ला अमित भट्ट आर्किटेक्ट, एडीएस, बीएसएन, कॅरामेला,इनोव्हेन इन्फ्रा, एडीएस डिझाइन स्टुडिओ, जीएम आर्किटेक्ट, एसबी स्कॅफॉर्म, ड्रोन मीडिया, नोबल हॉस्पिटल, इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अपोलो फार्मसी, अमर डान्स स्टुडिओ, द रिहॅब 360, आदर पुनावाला क्लीन इनिशिएटिव्ह ड्राईव्ह यांचा पाठिंबा लाभला होता.

निकाल:
21किमी खुला पुरुष गट: 1. अमित पाटील(01.13.13से), 2. धीरज यादव(01.15.14से), 3. संदीप रामेश्वर(01.17.44से);
21किमी महिला गट: 1. नीता सलामे(01.35.19से), 2. राणी मुचंडी(01.35.52से), 3. शिवानी चौरसिया(01.41.21से);
10किमी पुरुष गट: 1. अरविंद यादव(32.44से), 2. लव्ह चौधरी(33.02से), 3. अनमो शर्मा(33.55से);
10 किमी महिला गट: 1. शकीला वसावे(40.13से), 2. साधना यादव(41.42से), 3. वर्षा प्रजापती(49.02से).

,