पुणे, १० आॅगस्ट २०२६ : खराडी-केशवनगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल १५ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. आज आयुक्त राम यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि अभियंत्यांसह शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
नॉर्थ मेन रोडवरील एबीसी फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करताना रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
त्यानंतर हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी सुरू असलेली पावसाळी वाहिनी आणि ड्रेनेज लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहनांची मोठी वर्दळ असलेला हा रस्ता महत्त्वाचा असल्याने प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी अधिकारी, ठेकेदार आणि तज्ज्ञ सल्लागारांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
खराडी-केशवनगर पुलाची पाहणी करताना १५ ऑगस्टपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य अभियंता (पथ) यांना देण्यात आले. पुलाच्या अॅप्रोच रोडचे काम त्यानंतरही सुरू राहणार असल्याने नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राम यांनी केले.

More Stories
नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे योगदान: विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील
अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीवर महापौर आक्रमक; पोलिसांना १५ दिवसांचा अल्टिमेटम