September 15, 2026

ओव्हरटेकवर गुन्हा, मग ताफ्यामुळे त्रासाचे काय? पुणेकरांचा मोहोळांना पुणेकरांचा सवाल

पुणे, १६ सप्टेंबर २०२६ : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केल्याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात मंत्र्यांच्या ताफ्यामुळे भाविकांना झालेल्या त्रासावरून पुणेकरांनी सवाल उपस्थित केला आहे. सामान्य नागरिकाने ताफ्याला ओव्हरटेक केले तर गुन्हा दाखल होतो; मग मंत्र्यांच्या ताफ्यामुळे नागरिकांना त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोणाची?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सोमवारी रात्री विद्युत रोषणाईच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यासह इतर मान्यवरांचे वाहनांचे ताफे मंदिर परिसरात दाखल झाले. त्यावेळी परिसरात मोठी गर्दी असल्याने भाविक आणि नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी संचैती चौकात मोहोळ यांच्या सुरक्षेचा ताफा जात असताना चारचाकी वाहनाने ताफ्याला ओव्हरटेक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम विजय वनित (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ताफ्याला ओव्हरटेक करताना त्याच्या वाहनामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आता नियम आणि जबाबदारी सर्वांसाठी समान असण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर कारवाई होत असेल, तर व्हीआयपींच्या ताफ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचीही प्रशासनाने दखल घ्यावी, अशी भावना पुणेकरांनी व्यक्त केली आहे.