पुणे, १५ सप्टेंबर २०२६: भीमाशंकर मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यावरणाचे संवर्धन यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याबाबत आज आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बाबाजी काळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
विकास आराखड्यांतर्गत ग्रामस्थांना त्यांच्या विद्यमान जमिनीच्या क्षेत्रफळानुसार भूखंड देण्यात येणार असून, त्यासोबत १ बीएचके, २ बीएचके आणि ३ बीएचके स्वरूपातील सुसज्ज घरे बांधून देण्यात येणार आहेत. नवीन गावात ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, समाजमंदिर, अन्नछत्र, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, पथदिवे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

मंदिर परिसरातून गावाला जोडणारा कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, भाविकांसाठी प्रसादगृह, होल्डिंग एरिया, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. दर्शनानंतर भाविक पायरी मार्गाने गावात येऊ शकतील. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या व्यवसायाला चालना मिळेल. नदी व कुंड परिसराची स्वच्छता, फेन्सिंग तसेच भाविकांसाठी सुरक्षित तीर्थस्नानाची व्यवस्था करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विकासकामांदरम्यान ग्रामस्थांच्या सूचना व सहकार्य घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून कामांना गती देऊन जून २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकासकामांनंतर परिसरात अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम होऊ नये, यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.
यावेळी भीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याबाबत चित्रफित दाखविण्यात आली. गाव व परिसर कामाअंती कसा असेल, याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या बैठकीस भीमाशंकर येथील विश्वस्त, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

More Stories
राष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा
ओव्हरटेकवर गुन्हा, मग ताफ्यामुळे त्रासाचे काय? पुणेकरांचा मोहोळांना पुणेकरांचा सवाल
पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे येत्या २६ व २७ सप्टेंबरला यशदामध्ये आयोजन