पुणे, 14 ऑक्टोबर 2026: भारतातील पारंपरिक हस्तकला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. ‘कारीगर बाजार’ या हस्तकला महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन २३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बंड गार्डन येथील ऐतिहासिक डच पॅलेस येथे करण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दहा दिवसीय महोत्सवाला मागील पर्वात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम सादर करण्यात येणार आहे.
क्राफ्ट अँड आर्टिझन रिव्हायव्हल एलएलपीतर्फे आयोजित या महोत्सवात देशातील २६ हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील हस्तकलेचे प्रतिनिधित्व करणारे २५० हून अधिक स्टॉल्स असतील. देशाच्या विविध भागांतील पारंपरिक कलाप्रकार, हस्तकलेच्या वस्तू आणि त्यामागील कारागिरांची कला व कौशल्य यांचा अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.
यंदाच्या महोत्सवात वस्त्रे, पारंपरिक विणकाम, भरतकाम, लोककला, आदिवासी कला, दागिने, फॅशन अॅक्सेसरीज, गृहसजावट आणि जीवनशैलीशी संबंधित विविध उत्पादनांचा समावेश असेल. दिवाळीच्या खरेदीसाठी तसेच भेटवस्तू देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण हस्तनिर्मित वस्तूंची निवड करता येणार आहे. त्याचबरोबर या वस्तूंच्या निर्मितीमागे असलेल्या कारागिरांना आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याची संधीही मिळेल.
सामान्य प्रदर्शनांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य जपत कारीगर बाजारमध्ये कारागिरांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. केवळ हस्तनिर्मित वस्तूंची विक्री एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, त्या वस्तूंमागील कलाकौशल्य, परंपरा, कथा आणि सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या हस्तकलेच्या तंत्रांची आणि प्रादेशिक कलापरंपरांची ओळख करून घेता येणार आहे.
महोत्सवात पारंपरिक हस्तकलेची प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत. त्यामुळे कारागिरांना प्रत्यक्ष काम करताना पाहण्याची आणि विविध कलाकृती तयार करण्यामागील प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळेल. लोकसंगीत आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवातील वातावरण अधिक उत्सवी होणार आहे. कुटुंबांसह भेट देणारे नागरिक, कलाप्रेमी आणि हस्तकलेत रस असणाऱ्यांसाठी हा महोत्सव आकर्षण ठरणार आहे.
हस्तकलेसोबतच देशाच्या विविध भागांतील खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे खाद्यपदार्थही येथे उपलब्ध असतील. भारतातील विविध प्रांतांच्या खाद्यपरंपरांचा आस्वाद घेत हस्तकला आणि संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
पारंपरिक हस्तकलेला आधुनिक ग्राहकांशी जोडणे, कारागिरांच्या कलाकौशल्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाविषयी जागरूकता वाढवणे, हा कारीगर बाजारचा उद्देश आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने भारतीय हस्तकलेचा वारसा अनुभवण्याबरोबरच तो जपणाऱ्या कारागिरांना पाठबळ देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८९९७०७६२९ / ८७८८३४९६५४
ई-मेल : [info@karigarbazaar.com](

More Stories
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी