पुणे, १७ फेब्रुवारी २०२५ : ‘‘राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागणी केलेल्या सर्व कागदपत्रे आणि माहिती राज्य सरकारकडून सादर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले की आमची तयारी असून तातडीने निवडणुका घेऊ,’’ असे महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी स्पष्ट केले. एप्रिल महिन्यात या निवडणूका होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखविली भाजपच्या संघटन पर्व मेळाव्यानंतर बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ ‘राज्यातील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल. तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे. विधानसभेत महायुतीने २३७ जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयी होईल.’’
कोणतीही योजना बंद होणार नाही हे सरकार योजना बंद करणारे नसून नवनव्या योजना मांडणारे सरकार आहे. आम्ही प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्थशीर्ष तयार करून त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही,’असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात भाजप हा दीड कोटी सदस्य व तीन लाख सक्रिय सदस्य असलेला पक्ष बनवायचा आहे. आतापर्यंत एक कोटी १६ लाख सदस्य नोंदणी झाली आहे. उर्वरित लक्ष्य आम्ही २८ फेब्रुवारी अखेर साध्य करू, असेही ते म्हणाले.
मुंडे प्रकरणावर चुप्पी
‘बीड प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, हा मुंडे, अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही,’, असे सांगून बावनकुळे यांनी या प्रश्नावर अधिक बोलण्यास नकार दिला.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मेट्रो सफर, रेल्वे म्युझियम पाहून बालगोपाल हरखले
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना