मुंबई, १४ जुलै २०२६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रस्तावित ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. सुमारे अर्धा तास झालेल्या बैठकीत सद्यस्थितीत ऑनलाइन परीक्षा लादली जाणार नाही, तसेच या निर्णयावर पुनर्विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुवारी होणारा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बुधवारी एमपीएससीचे अध्यक्ष व सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन ऑनलाइन परीक्षा संदर्भातील निर्णयाचा आढावा घेतला जाईल. भविष्यात ऑनलाइन परीक्षा घ्यायची झाल्यास राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा एकाच वेळी, पारदर्शक आणि सक्षम यंत्रणेद्वारे घेता येतील, अशी व्यवस्था उभी राहिल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
याशिवाय, १७ जुलैपर्यंत सुरू असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘क’) अर्ज प्रक्रियेबाबतही पुनर्विचार करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे सध्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा प्रस्ताव ‘होल्ड’वर असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
एमपीएससी अधिकाऱ्यांसोबतची बैठक झाल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींशी पुन्हा चर्चा करून पुढील भूमिका जाहीर केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाने ही बैठक आयोजित केल्याबद्दल विद्यार्थी प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले. तसेच आमदार अभिमन्यू पवार, राजेश पांडे आणि राज देशमुख यांनी विद्यार्थ्यांची बाजू प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
बैठकीस किरण निंभोरे, शिवराज मोरे, प्रमोद पाटील, लेषपाल जवळगे, अक्षय जैन, अनिकेत देशमाने, नितीन आंधळे, अर्चना शहा, गणेश उबाळे आणि निखिल मगर यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

More Stories
महसूल खात्यात ‘कलम १५५’ चा गैरवापर! पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित
Pune: वडगावशेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार बापूसाहेब पठारे यांचा सभागृहात आवाज
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ