January 16, 2026

पुणे महापालिकेचा फुसका बार: जीबीएसच्या उपचारांवरील मदतीसाठी ‘नियम व अटी’ लागू

पुणे, २० फेब्रुवारी २०२५ : गुलियन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) झालेल्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना एक एक लाखाची मदत करण्‍याची घोषणा तर मोठया थाटात केली. परंतु, प्रत्‍यक्ष त्‍याची अंमलबजावणी करताना त्‍याला ‘नियम व अटी’ लागू केल्‍या आहेत. ज्‍या रुग्‍णांचा आरोग्‍य विमा असेल त्‍यांना ही मदत मिळणार नसून, विम्‍याच्‍या मर्यादेपेक्षा जास्‍त रक्‍कम भरावी लागली तरीही त्‍यांना महापालिकेकडून ही मदत मिळणार नसून तो खर्च त्‍यांना खिशातून करावा लागणार आहे.

‘जीबीएस’ रुग्‍णांच्‍या उपचारांचा येणारा पाच ते दहा लाख रुपयांचा खर्च परवडत नसल्‍याने त्‍यांच्‍या खर्चाचा भार हलका व्‍हावा यासाठी महापालिकेने या रुग्‍णांसाठी प्रत्‍येकी १ लाखाची मदत करण्‍याची घोषणा केली होती. खासगी रुग्‍णालयाने रुग्‍णांना अंतिम बिल देताना त्‍यातून एक लाख रुपये वजा करून ते द्यावेत, असे सांगितले होते. त्‍यावेळी, सरसकट सर्वच रुग्‍णांना ही मदत केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र आता त्‍यांना प्रत्‍यक्षात बिल देण्‍याची वेळ आल्‍याने मात्र हात आखडता घेत त्‍याला ‘नियम व अटी’ लागू करत मुळ निर्णयापासूनच ‘घुमजाव’ केल्‍याने लाखो रुपये खर्च झालेल्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाईकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या आरोग्‍यप्रमुख डॉ. नीना बोराडे म्‍हणाल्‍या की, जे ‘जीबीएस’ चे रुग्‍ण शहरी –गरीब योजनेत आहेत त्‍यांना एक लाख रुपयांची मदतीची रक्‍कम वाढवून ती मर्यादा दोन लाखांची केली आहे. तर महापालिकेचे आजी माजी अधिकारी, कर्मचारी यांना अंशदायी वैद्यकीय योजनेतून १०० टक्‍के बिलाचा परतावा मिळेल. तर महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेतील रुग्‍णांवरही मोफत उपचार होत आहेत.

जे ‘जीबीएस’ चे रुग्‍ण कोणत्‍याच योजनेत बसत नाहीत व १४ जानेवारीनंतर खासगी रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल झाले व महापालिकेच्‍या कार्यक्षेत्रात राहतात त्‍यांना १ लाखाची मदत मिळेल. परंतु, ज्‍या रुग्‍णांना आरोग्‍य विमा आहे त्‍यांना ती लाखाची मदत मिळणार नाही. तर पुण्‍यात उपचार घेणाऱ्या बाहेरील जिल्ह्यांतील रुग्‍णांना ‘आयव्‍हीआयजी’ औषधांची मदत करता येते. मात्र त्‍यांनाही नियमानुसार लाखाची मदत देता येणार नाही. – डॉ. नीना बोराडे, आरोग्‍यप्रमुख, पुणे मनपा