January 16, 2026

सोशल मीडियावर पीएमपीएमएलच्या बनावट अॅपचा फैलाव, प्रवाशांना सतर्कतेचा इशारा

पुणे, २० फेब्रुवारो २०२५: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “आपली पीएमपीएमएल” या अधिकृत मोबाईल अॅपच्या बनावट आवृत्तीबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. काही लोकांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या बनावट अॅपची जाहिरात करून प्रवाशांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे.

पीएमपीएमएलने या प्रकरणी पोलीस सायबर सेल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. बनावट अॅपची जाहिरात करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. सायबर सेल आणि पीएमपीएमएलची तांत्रिक विश्लेषण टीम या जाहिरातींवर सातत्याने लक्ष ठेवत असून, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर आय.टी. कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे.

यु-ट्यूब, टेलिग्राम, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बनावट अॅपची जाहिरात केली जात आहे. या जाहिरातींमध्ये प्रवाशांना पैसे न देता पास काढता येईल अशा खोट्या आश्वासनांद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पीएमपीएमएलने प्रवाशांना या बनावट अॅपच्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

पीएमपीएमएलने स्पष्ट केले आहे की बनावट अॅप वापरताना आढळलेल्या व्यक्तींविरुद्धही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रवाशांनी केवळ अधिकृत “Apli PMPML” अॅप वापरावे आणि कोणत्याही संशयास्पद क्रियाकलापांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.