November 2, 2024

पुण्यातील उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक

पुणे, १९/०५/२०२३: आंध्र प्रदेशातील सूत गिरणीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील एका उद्योजकाची एक कोटी नऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सन्नाप्पा मुदप्पा बंदिकी (रा. आदोनी, जि. कर्नुल, आंध्र प्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका उद्योजकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंदिकी आणि तक्रारदार उद्योजकाच्या वडिलांचा परिचय होता. तक्रारदारच्या वडिलांना आंध्र प्रदेशातील संगीता काॅटन सूत गिरणीत गुंतवणुकीचे आमिष बंदिकी याने दाखविले होते. सूत गिरणीत व्यवसायत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल,असे आमिष दाखविले हाेते. तक्रारदाराच्या वडिलांनी बंदिकीला एक कोटी नऊ लाख रुपये वेळोवेळी दिले.

दरम्यान, उद्योजकाच्या वडिलांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर उद्योजकाने बंदिकी याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा बंदिकीने त्यांना परतावा तसेच मूळ मुद्दल देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.