October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: व्याजाच्या बदल्यात दिलेला लॅपटॉप माघारी मागितला, दाम्पत्याला बेदम मारहाण

पुणे, दि.१९/०५/२०२३: व्याजाच्या बदल्यात ताब्यात घेतलेला लॅपटॉप माघारी मागितल्याच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. ही घटना १७ मे रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास जुना मुंढवा रस्ता परिसरात घडली.

संजय कारभारी शिंदे (वय ३१ ) आणि शंकर हरीदास साबळे (वय २० रा. दोघेही चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती रोशन उसाकोयल याने संजयकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्याबदल्यात लॅपटॉप त्याच्याकडे दिला होता. १७ मे रोजी उसाकोयल दाम्पत्य संजयकडे लॅपटॉप मागण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्यामुळे त्याने रोशनला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. भांडणात मध्यस्थी करताना शस्त्राचा वार महिलेच्या दंडाला लागला. त्यानंतर आरोपी शंकरने चाकूने दाम्पत्याला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे तपास करीत आहेत.