September 14, 2024

मध्यराञी एका हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट; जखमी वा जिवितहानी नाही

पुणे, 11 फेब्रुवारी 2024- काल मध्यराञी ०३•१२ वाजता हडपसर, सातववाडी, साईनगर सोसायटी येथे असलेल्या भन्नाट बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून काळे बोराटे नगर व हडपसर अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, तळमजला अधिक दोन मजली इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या भन्नाट बिर्याणी हाऊसमध्ये आग लागली होती तसेच वर दोन मजल्यावर सदनिकेत काही रहिवाशी असल्याचे ही समजले. त्याचवेळी तातडीने जवानांनी ०३ पुरुष व ०३ महिला यांना सुरक्षित ठिकाणी नेत बिर्याणी हाऊसचे शटर उघडून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दलाची मदत पोहोचण्यापुर्वी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. जवानांनी घटनास्थळावरुन तीन सिलेंडर बाहेर काढले तर एका सिलेंडरचा स्फोट झाल्यचे निदर्शनास आले. सुमारे पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणत जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत तीस मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. या आगीमध्ये बिर्याणी हाऊसमधील सर्व वस्तुंचे पुर्ण नुकसान झाले असून शेजारी असलेल्या इतर दोन दुकानांना आगीची झळ बसली आहे. या घटनेत जखमी वा जिवितहानी नाही.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड तसेच वाहनचालक राजू शेख, नारायण जगताप व फायरमन अनिमिष कोंडगेकर, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, केतन घाडगे, संकेत शिंदे, डगळे यांनी सहभाग घेतला.