February 28, 2024

टाटा, बजाज आणि पुणे कनेक्शन

पुणे, ११/०२/२०२४: टाटा आणि बजाज या कंपन्यांनी पुण्याच्याच नव्हे तर देशाच्या औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मोठे बदल घडवून आणले आहेत. पण या दोन कुटुंबांच्या औद्योगिक प्रवासातील मोठे टप्पे पुण्यात घडले आहेत आणि त्याचाच इतिहास जाणून घेण्याची संधी पुण्यात सुरु असलेल्या हिस्टरी लिटरेचर फेस्टिव्हलने श्रोत्यांना दिली. लेखक आणि टाटा ग्रुपचे मार्केटीअर हरिश भट यांनी टाटांच्या इतिहासावर प्रकाश टाकला, तर हेरिटेज मैनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या संघमित्रा चैटर्जी यांनी बजाज कुटुंबाच्या आणि त्यांच्या औद्योगिक इतिहासावर प्रकाश टाकला. लेखक, इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ चिन्मय तुंबे यांनी या दोघांशी संवाद साधला.

भारतामध्ये स्टील निर्मितीचा पाया रचणाऱ्या टाटा ग्रुपने देशामध्ये आजवर अनेक गोष्टींची सुरुवात केली आहे. याचेच उदाहरण देताना, हरीश भट म्हणाले की, “एकोणिसाव्या शतकात स्टील कंपनी स्थापन केल्यानंतर कामगारांसाठीचा भारतातील पहिला एक्सी़डेंटल इन्शुरन्स टाटांनी आणला. १८८० च्या दरम्यान कंपनीच्या कामगारांसाठी पेन्शन योजना सुरु केली. त्यांनंतर कर्मचाऱ्यांकरता प्रॉव्हिडंट फंडाची देखील तरतूद टाटांनी केली.” हे सगळं करत असतानाच टाटांनी कायम देश हिताकडे कसे लक्ष दिले याचीही अनेक उहाहरणे त्यांनी दिली.

पुणे आणि टाटांचे आणखी एक कनेक्शन उलगडताना भट म्हणाले की, डेक्कन जिमखाना येथे खेळाच्या स्पर्धा पाहायला आलेले असताना टाटांना भारत अजूनही ऑलिम्पिकसारख्या सर्धेत का भाग घेत नाही हा प्रश्न पडला. लगेचच त्यांनी सरकारला पत्र लिहून योग्य ती कार्यवाही करत १९२० साली एन्टवर्प येथे झालेल्या ऑलिम्पिकला पहिलं भारतीय पथक पाठविलं.

बजाज कुटुंबाबत बोलताना संघमित्रा म्हणाल्या की, “जमनालाल बजाज हे खरेतर दत्तकपुत्र होते. राजस्थानातील एका गावातून त्यांना आणले होते.” नातू होण्यापूर्वीच आपल्या मुलाचा देहांत झाल्यामुळे त्यांना दत्तक घेणे हा त्यांच्या आजोबांचा निर्णय होता. त्यामुळे जमनालाल यांना लहानपणी वडिलांसमान कोणी दिशादर्शक मिळाला नाही. “त्यांच्या आयुष्यातील ही कमतरता १९१७ साली गांधीजींंच्या रुपाने भरुन निघाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत त्यांनी गांधीजींचा सल्ला घेत काम केले.” पुढील अनेक दशके बजाज कुटुंबाचे राहणीमान हे गांधीजींच्या जीवनशैलीवरच आधारित होते. अनेक वर्षे हे कुटुंब वर्धा येथील आश्रमातच राहिले.

राहुल बजाज यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल तसेच सार्वजनिक जीवनात धाडसाने बोलण्याच्या शैलीबाबत विचारले असता, संघमित्रा यांनी जमनालाल बजाज यांच्या लहानपणी घडलेल्या घटनेचा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, “१३ वर्षांचे असताना जमनालाल यांचे वडिलांशी भांडण झाले असता, मला तुमच्या संपत्तीतील काहीच नको असे पत्र वडिलांना लिहून ते दिवसभरासाठी पसार झाले होते.” हा स्पष्टवक्तेपणा कुठेतरी अंगातच होता, असे त्या म्हणाल्या.

दोन्ही कुटुंबांच्या पुण्यातील उद्योग सुरु करण्याच्या काळाबद्दल बोलताना वक्ते म्हणाले की, पुण्यातील अधिकारी स गो बर्वे यांच्या पुढाकारामुळे टाटा आणि बजाज यांचे पुण्यातील आज भव्य वाटणारे प्रकल्प सुरु झाले. टाटांनी तिथे टेल्को किंवा आजची टाटा मोटर्स ही कंपनी सुरु केली, तर बजाज यांनी व्हेस्पा स्कूटर आणि रिक्शाचा प्लांट येथे सुरु केला. याचबरोबर टाटांची इंडिका किंवा बजाजची चेतक स्कूटर या पूर्णपणे देशी बनावटीच्या पुण्यात बनलेल्या गाड्यांबद्दलही अनेक रंजक कथा वक्त्यांनी सांगितल्या.