May 18, 2024

उलगडला समर्पित आदर्श सहजीवनाचा प्रवास

पुणे दि. २४ एप्रिल, २०२३: अंध असूनही आपल्यासारख्याच इतरांना सोबत पुढे नेण्याचा प्रामाणिक ध्यास, प्राणांतिक संकटांवर मात करीत जिवंत परत आलेल्या ‘आपल्या माणसाला’ पुन्हा ताकदीने उभं करण्याची जिद्द, आणि पोटच्या मुलाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी उचललेला सामाजिक कार्याचा वसा… तीन जोडप्यांचा असा थक्क करणारा सहजीवनाचा प्रवास आज पुणेकरांसमोर उलगडला. निमित्त होते हिंदू महिला सभा आयोजित ‘समर्पित आदर्श सहजीवन’ या कार्यक्रमाचे. नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी नुकताच सदर कार्यक्रम संपन्न झाला.
नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंजेस (एनएडब्लूपीसी) संस्थेचे संस्थापक डॉ राहुल देशमुख व त्यांच्या पत्नी देवता देशमुख, ‘आपलं घर’ संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर व त्यांच्या पत्नी साधना फळणीकर आणि सूर्या जीमचे संस्थापक आणि व्यायामतज्ज्ञ डॉ अरुण दातार व त्यांच्या पत्नी डॉ. आरती दातार या जोडप्यांचा समर्पित सहजीवनाचा प्रवास यावेळी मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन अर्थात ‘सिर्फ’ संस्थेच्या सुमेधा चिथडे यांनी यावेळी या जोडप्यांशी संवाद साधत त्यांचे नाते, प्रेम, जिद्द, त्याग, संघर्ष, समर्पण आणि त्या पलीकडचे सहजीवन आदी विषयांवर गप्पा मारल्या. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, अभिनेते भरत जाधव, प्रतिभा शाहू मोडक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स प महाविद्यालयात झालेली ओळख, त्याचे मैत्री, पुढे प्रेमात झालेले रुपांतर आणि आता पती-पत्नी म्हणून एकमेकांना मिळत असलेली खंबीर साथ याबद्दल सांगताना देवता देशमुख म्हणाल्या, “आपण अंध असूनही स्वप्नांना गवसणी घालण्याचा राहुलचा आशावाद माझ्यासारख्या सामान्य मुलीला थक्क करणारा होता. समाजासाठी आपण काहीतरी वेगळं करायचं आहे असं ठरवून पुण्यात आलेली मी राहुलला भेटले तेव्हा माझी स्वप्न अक्षरश: विरली आणि त्याची स्वप्न नकळत ‘आमची’ झाली.” देवाताच्या रुपात मला चांगली मैत्रीण, समीक्षक गवसली. लग्नानंतरही मैत्रीचे नाते आम्ही संपू दिले नाही, आत्मीयता, आदर कमी होऊ दिला नाही. आजवरच्या प्रवासात लाभलेले शिक्षक, विद्यार्थी, मित्र मैत्रिणी नेहमीच बळ देतात, असे राहुल देशमुख यांनी सांगितले.

अंगावरची हळद उतरत नाही तोवर बस धडकल्याने झालेल्या अपघातातून सावरताना मला माझ्या बायकोची खंबीर साथ मिळाली. तिने आमच्यासाठी न खचता कष्ट केले, असे डॉ अरुण दातार म्हणाले. मृत्यूच्या दाढेतून ‘माझं माणूस’ मला परत मिळालं हेच देवाचे माझ्यावर अगणित उपकार आहेत असे सांगत डॉ आरती दातार म्हणाल्या, “एखाद्यामध्ये सकारात्मकता आणि जिद्द किती असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझा नवरा. इतक्या मोठा अपघातून बाहेर पडत असताना कधी त्यांनी त्रास होतोय याची कुरकुर केली नाही. परिस्थितीला सक्षमपणे, न डगमगता ते सामोरे गेले. खडतर परिस्थितीतून बाहेर पडत व्यायाम, शरीरसौष्ठव, वेटलीफ्टिंग करण्यासोबतच सूर्या जीमच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये व्यायामाचा संस्कार रुजविला. आज सहजीवनाची ५१ वर्षे पूर्ण करीत असताना मनात फक्त समाधानाचा भाव आहे.”

तीन तपं एकमेकांना खंबीर साथ देणारे ‘आपलं घर’ संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर व साधना  फळणीकर यांनी देखील आपला प्रवास उलगडून दाखविला. “खडतर बालपण, नशिबात आलेल वाईट जगण यांवर मात करत सुरु झालेल्या सहजीवनात अवघ्या १६ वर्षांचा पोटचा पोरगा मृत्यू पावला. त्याचं जाण समाजकार्याकडे वळण्याची खूण समजत आम्ही अनाथ मुलांना घर देण्यासोबतच बेघर आजी आजोबांना हक्काचा निवारा मिळावा या हेतून ‘आपलं घर’ ही संस्था सुरु केली. माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात एका उपजिल्हाधिकाऱ्याची मुलगी माझ्यासाठी घरोघरी अगरबत्ती विकत फिरली. मुलाच्या जाण्याने समाजासाठी आपण काहीतरी  सुरु करू ही सहवेदना दिली, असे विजय फळणीकर म्हणाले. तर लग्नाच्या सुरवातीच्या दिवसातील अनेक किस्से साधना फळणीकर यांनी सांगितले.

सुप्रिया दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर स्मिता नातू यांनी आभार मानले.