May 10, 2024

कला आणि नाविन्यता उपक्रमांनी रंगले ‘हुनर हाट’

पुणे, दि. ३१ ऑक्टोबर, २०२३: शालेय अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व अधिक बहरावे या उद्देशाने एरंडवणे गणेशनगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने नुकतेच ‘हुनर हाट’ या खास उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलाकृती, कलागुण यांबरोबरच नाविन्यतापूर्ण व शास्त्रीय प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या हुनर हाटचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार, म्युरल आर्टीस्ट आणि क्रिएटिव्ह क्लबच्या संचालिका सुजाता धारप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, सचिव मालती कलमाडी, कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या सहयोगी संचालिका डॉ देवसेना देसाई, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या प्राचार्या पल्लवी नाईक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

हुनर हाटमध्ये पेपर प्लेटवर साकारलेली कला, मधुबनी, गोंड, पिपली, वारली कला, सँड पेपरचा वापर करीत चितारलेली चित्रे, कॉफीचा वापर करून साकारण्यात आलेली चित्रे, डुडल्स, टू डी, ग्राफिटी, इल्युजन, अॅबस्ट्रॅक्ट कला आदी प्रकारात चित्रे व वस्तू बनविण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी बनविलेली नाविन्यतापूर्ण व शास्त्रीय उपकरणे ही देखील या हुनर हाट मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. यामध्ये प्रामुख्याने रिव्हर्स प्लास्टिक व्हेंडिंग मशीन, अॅक्वापोनिक्स, सारेगमप या स्वरांचा प्लाँट की बोर्ड आदींचा समावेश होता. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या दरम्यान हुनर कला मंचचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, कावितावाचन आदींचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी यावेळी प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.