May 10, 2024

दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने संपन्न झाला ११ वा तालचक्र महोत्सव

पुणे, दि. ३० ऑक्टोबर, २०२३ : युवा वादकांसोबतच दिग्गज कलाकारांचे बहारदार सादरीकरण, शास्त्रीय संगीतासोबतच सादर झालेले फ्युजन आणि तालदिंडी रुपी अनोख्या प्रयोगाने मंत्रमुग्ध झालेलेल रसिक अशा वातावरणात यावर्षीचा ११ वा तालचक्र महोत्सव संपन्न झाला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी तीन दिवसीय तालचक्र महोत्सव नुकताच रंगला. सदर महोत्सवाची संकल्पना ही सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांची असून पुनीत बालन समूह हे या वर्षी महोत्सवाचे प्रमुख आयोजक होते.

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बँक ऑफ इंडियाचे सह महाव्यवस्थापक अभिनव काळे, चंदुकाका सराफचे जाहिरात व विपणन प्रमुख अमोल पात्रे यांच्या उपस्थितीत महोत्सवाला दीप प्रज्वलन करीत सुरुवात झाली. यावेळी व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश असबे, लोकमान्य मल्टीपर्पजचे पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव, ओर्लीकॉन बाल्झरचे प्रवीण शिरसे व सराफ अॅंड सन्सच्या विपणन प्रमुख वैष्णवी ताम्हाणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

उद्घाटनाच्या सत्रात युवा तबलावादक सागर पटोकार आणि रोहित ठाकूर यांनी ढंगदार वादनाने वातावरणनिर्मिती केली तर सुरंजन खंडाळकर आणि शरयू दाते या युवा गायकांनी त्या वातावरणाला सुरेलतेची जोड दिली. सागर पटोकार व रोहित ठाकूर यांनी तीन तालाचे बहारदार सादरीकरण केले. पेशकार, कायदा, रेला आणि बंदिशी अशा क्रमाने त्यांनी प्रस्तुतीकरण केले. तसेच तिस्र आणि चतुस्र जातीत फारुखाबाद, पंजाब घराण्याच्या पारंपरिक बंदिशी तयारीने सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. बनारस घराण्याची बंदिश सादर करीत त्यांनी आपल्या सहवादनाला विराम दिला. अभिषेक शिनकर यांनी संवादिनीवर पूरक साथ केली. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सुरंजन खंडाळकर आणि शरयू दाते यांचा ‘सूर सुरंजन’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये त्यांनी मराठी भावगीते, नाट्यगीत, गझल आणि अभंग सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पं विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तालदिंडी या विशेष कार्यक्रमाने झाली. वारकऱ्यांच्या दिंडी सारखी ही तालवाद्य, गायन आणि नृत्याची दिंडी रसिकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचा आनंद घाटे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात राग यमन मधील तीन तालच्या सादरीकरणाने झाली. यावेळी ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ या भजन प्रस्तुतीने सुरू झालेली दिंडी पुढे तीन तालातील प्रभावी सादरीकरण, थाट, १६ चक्कर, परमेलू शृंखला यांच्या प्रस्तुतीने उत्तरोत्तर बहरत गेली. यानंतर ‘अबीर गुलाल उधळीत रंग..’ या भजनाचे सादरीकरण होऊन दिंडीचा समारोप झाला. यावेळी पं विजय घाटे (तबला), पं डॉ राम देशपांडे (गायन), सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर, गंधार देशपांडे (गायन), ओंकार दळवी (पखावज), अमर ओक (बासरी), सागर पटोकार (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी) यांचे एकत्रित सादरीकरण झाले. दुसऱ्या दिवसाचा समारोप नीलाद्री कुमार यांच्या सुरबहार, सतार आणि झितार वादनाने झाला. तीनही वाद्यांचा आविष्कार यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभवला आणि त्याला उत्फुर्त प्रतिसादही दिला. नीलाद्री कुमार यांनी सूरबहार वाद्यावर राग जयजयवंती सादर केला. त्यांनी सादर केलेल्या राग दरबारीमधील विलंबित तीन तालातील बंदिशीने उपस्थितांची मने जिंकली. झितारवर नीलाद्री यांनी काही चित्रपट गीतेही सादर केली ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

सेनिया बंगश घराण्याच्या ७ व्या पिढीचे कलाकार असलेले अमान अली बंगश यांच्या सुमधुर सरोदवादनसोबतच बनारस घराण्याचे पारंपरिक तबलावादन ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मिळाली. अमान अली बंगश यांनी यावेळी राग श्री सादर केला. यामध्ये त्यांनी मध्यलय झपताल आणि द्रुतलय तीनतालमध्ये दोन गत सादर केल्या. पंडित कुमार बोस यांनीही यावेळी बनारस घराण्याचे तबलावादन प्रस्तुत करीत पूरक तबलासाथ केली.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पं वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी ‘फ्युजन २०२३’ हा कार्यक्रम सादर केला. राग रागेश्रीने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘जिया मोरा लागे ना…’ ही मिश्र पिलू मधील ठुमरी प्रस्तुत केली. ‘रुसी ना मानी राधा…’ या त्यांनी सादर केलेल्या रचनेने उपस्थितांची वाह वाह मिळविली. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘लागी कलेजवा कटार…’ या ठूमरीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘ दिल की तपीशा आज है आफताब…’ या गीताने त्यांनी कार्यक्रमाचा आणि महोत्सवाचा समारोप केला. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

यावर्षी महोत्सवास पुनीत बालन गृप यांसोबतच चंदुकाका सराफ अँड सन्स, व्यंकटेश बिल्डकॉन, लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना मसाले, बँक ऑफ महाराष्ट्र, गिरीकंद ट्रॅव्हल्स, ओर्लीकॉन बाल्झर, विलो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.