February 27, 2024

ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले; डॉ. सच्चिदानंद जोशी यांचे प्रतिपादन

पुणे, दिनांक, १ डिसेंबर, २०२३ : नव्या पिढीमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्याचे दायित्व हे आपल्या पिढी हे आहे. आज मोबाईल व इतर उपकरणे यांमुळे शुद्ध भाषा लिहिणे ही समस्या बनली आहे. या ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सचे प्रमुख डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी केले.

डॉ जोशी यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेला सुरुवात झाली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘नवोन्मेष : सेलिब्रेटिंग स्टोरी ऑफ रिज्युव्हिनेशन’ ही यावर्षीच्या कथायात्रा २०२३ ची मध्यवर्ती संकल्पना असून आजच्या धकाधकीच्या जीवनातून हरवत चाललेल्या ‘गोष्टी’ला पुन्हा नव्याने झळाळी मिळावी, तिचं महत्व पुन्हा आपल्या आयुष्यात रुजावं या उद्देशाने कथायात्रेचे आयोजन भाषा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येते.

उद्घाटनावेळी बोलताना डॉ जोशी म्हणाले, ” केवळ भाषा बोलण्याचा आग्रह करणे पुरेसे नाही. भाषा शुद्धतेचा आग्रह करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशात आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान नसतो म्हणून आज भाषेवर संकटे येत आहेत. हे असे का झाले याचा विचार करायला हवा. आपणच आपल्या मातृभाषेला मागे लोटलं आहे.”

आज भारतात २ कोटींहून जास्त इतका जगातील सर्वांत मोठा हस्तलिखितांचा संग्रह आहे. मात्र ही बाब भारतीयांनी माहिती नाही, याचे अनेकदा वाईट वाटते. याबद्दलची जाणीव व माहिती नागरिकांना व्हायला हवी.”

देशाच्या नव्या संसदेत कलाकृती कोणत्या असाव्यात या संदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे काम मी पाहिले. भारताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन कलाकृतींद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचेही जोशी म्हणाले.

पुण्यातील लोक शुद्ध मराठी बोलतात इथे आल्यावर मला मराठीमध्ये बोलायची धडकी भरते. तुम्ही इतके वाईट मराठी बोलत नाही हो .. ही पुणेकरांची प्रतिक्रिया मला सुखावून जाते असेही डॉ जोशी यांनी सांगितले.

भाषा ही केवळ लिखित किंवा बोललेली भाषा नसते तर नृत्यातील भाव, मुद्रा यातूनही भाषा सुंदरपणे मांडता येते असे सांगत डॉ अभय फिरोदिया म्हणाले, “भाषा ही माणसाला माणूस बनवते. भाषा नसेल तर विचारांची देवाण घेवाण करता येणार नाही. इतर प्राण्यांपेक्षा माणूस भाषेमुळेच वेगळा ठरते. मागील ३०-४० वर्षांत प्रादेशिक भाषा उपेक्षीली गेली आहे. आपली पुढची पिढी मराठी भाषेच्या सौंदर्याला मुकली आहे. त्यांना मराठी भाषेतील भावना, स्फूर्ती यांचा आनंद घेता येणार नाही याचे वाईट वाटते.”

आज भाषा सुधारण्यासाठी नव्या पिढीत लहान मुलांमध्ये भाषेचे प्रेम वाढविण्याचे असे उपक्रम व्हायला हवेत. हे करणे नागरिक म्हणून आपले मूलभूत कार्य आहे. याचे परिणाम लगेच पुढच्या आठवड्यात दिसणार नाही पण भाषेची, देशाची सांस्कृतिक मूमूल्ये यामुळे नजीकच्या भविष्यात टिकतील आणि पुढे जातील, असेही डॉ फिरोदिया यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटना आधी ज्येष्ठ इटालियन नृत्यांगना पद्मश्री डॉ.इलियाना सिटारिस्टी यांच्या ओडिसी नृत्यातून सादर केलेल्या एकलव्याच्या कहाणीने महोत्सवाला सुरुवात झाली.

तीन दिवसांच्या भरगच्च उपक्रमांनी कथायात्रेचा हा सोहळा रंगणार असून ललितकला प्रकारांचे सादरीकरण आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अशा दोन उपक्रमांतून कथायात्रा सादर होईल. सदर उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून सर्व नागरीकांनी या अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांना भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कथायायात्रे अंतर्गत होणारे काही मुख्य कार्यक्रम:
*पपेट शोच्या माध्यमातून नव्या दृष्टीने अरेबियन नाईट्सची कहाणी सादर करीत आहे, नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था कटकथा,
*लावणी कलाकारांच्या जीवन कहाणीचा मागोवा घेणारे राष्ट्रीय स्तरावर गाजलेले नृत्यनाट्य ‘लावणी के रंग‘, : बी स्पॉट प्रॉडक्शन्स, मुंबई
*ज्येष्ठ हिंदी लेखक निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित कथा सादरीकरण करत आहेत ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम
*रामायणातील कथानकांवर आधारित पिंगुळीचे बाहुली नाट्य सादर करीत आहेत सिंधुदुर्ग येथील चेतन गंगावणे
*‘व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी पाउलखुणांचा मागोवा घेत आहेत ज्येष्ठ वनअधिकारी तुषार चव्हाण
*नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला नौदलाची अभिमानगाथा सांगत आहेत रिअर ॲडमिरल आशिष कुलकर्णी व लोथल येथील नौदलाच्या संग्रहालयाचे डेप्युटी कमांडंट दोराइबाबू,
*कहाणी दशावताराची: नृत्यनाट्य : कथक व भरतनाट्यम यांचा मनोहारी संगम मुंबई व पुण्यातील तज्ज्ञ कलाकारांच्या सादरीकरणातून
* ‘मेडिसिन्स ॲक्रॉस बॉर्डस’ : पुस्तक प्रकाशन व अनुभवकथन : डॉ भरत केळकर
*अजिंठ्याच्या व वेरूळच्या डिजिटायझेशन चा कहाणीपट उलगडत आहेत रवींद्र बोरावके आणि पुणेकरांच्या भेटीला खास येत आहे
‘कहाणी लष्कराच्या बॅंडची!’ बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या दोनशे वर्षं जुन्या बॅंडची कथा व कर्णमधुर सादरीकरण

चार विविध विषयांवरील प्रदर्शने
*‘सेलिब्रेशन ऑफ लाईफ’ : द फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे व ‘भाषा’ने आयोजित केलेल्या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलाकृतींचे प्रदर्शन
*‘वन्यजीव संवर्धन‘: नेचर वॉक
*‘वारी‘: संदेश भंडारे आणि
*भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट मधील दुर्मिळ पुस्तकांचे खास प्रदर्शन याशिवाय, मुलांसाठी व मोठ्यांसाठी विविध कार्यशाळा, लघुपट, चित्रपट व कथामंच

भाषा संस्थेविषयी
प्रसिद्ध लेखिका, पत्रकार, बालसाहित्याच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक स्वाती राजे यांनी स्थापन केलेली ‘भाषा’ ही स्वयंसेवी संस्था प्रादेशिक भाषांचा जतन -संवर्धनासाठी गेली पंधरा वर्षे विविध प्रकल्प- उपक्रमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये लेखक, पत्रकार, दृकश्राव्य माध्यमतज्ज्ञ, अनुभवी व्यावसायिक, उद्योगपती, कलाकार, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. आपल्या मातृभाषेविषयीची जाणीवजागृती, रुची आणि प्रेम निर्माण करण्यासाठी पारंपरिक व आधुनिक सर्व माध्यमांचा कल्पक वापर करण्याकडे ‘भाषा’ संस्था लक्ष पुरवते. आपल्या भाषिक वारशाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी नव्या पिढीला ग्रंथांशी जोडणे, हा प्रमुख उद्देश ‘भाषा’ संस्था मध्यवर्ती ठेवून कार्यरत आहे. भाषा संस्थेच्या सर्व उपक्रमांना आजवर प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. स्थानिक पातळीवर तसेच राज्य – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भाषा’ चे उपक्रम सुरू आहेत आणि या उपक्रमांचे औचित्य साऱ्यांच्या आदराचा व कौतुकाचा भाग बनले आहे.