September 17, 2024

महिनाभरात ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी

पुणे, 01 डिसेंबर 2023: पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नोव्हेंबर या एकाच महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई करुन २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी करण्यात आली असल्याचे पिंपरी चिंचवड शहर वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त बापू बांगर यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे असुन देहू व आळंदी ही संतांची भूमी आहे. त्याअनुषंगाने राज्यातील तसेच देशातील नागरीक हे उदरनिर्वाहाकरीता या भागात स्थाईक झाल्यामुळे शहराचा विकास तसेच वाढही वेगाने होत आहे.

दळणवळणाकरीता दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने वाहनांशी निगडीत अपराधांमध्ये तसेच चाहतूकीच्या नियमांचे उल्लंघनात वाढ झालेली आहे. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम मोडण्यास वेळीच प्रतिबंध करण्याकरीता पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून दैनंदिनरित्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असते.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने वाहतूक शाखेमार्फत १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे-९३९, सिग्नल तोडणे- १ हजार ७२८, दुचाकीवर तीन प्रवासी- ३ हजार ५५९, विना हेल्मेट- २ हजार ८८०, सीटबेल्ट न लावणे – २ हजार २२०, काळी काच- १ हजार ३९०, सायलेंसर- ८८४, वाहतूक अडथळा- ८ हजार ९६७ तसेच बीआरटी मार्गिकेमध्ये प्रवेश करणाऱ्या ३ हजार २२९ चाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

या कालावधीत जड अवजड वाहनांस प्रवेश बंदी केलेल्या मार्गावर प्रवेश करणाऱ्या ६ हजार ३७२ जड अवजड वाहनांवर करवाई करण्यात आलेली आहे. तसेच विरुद्ध दिशेने चाहन चालविणारे ६०७ वाहन चालकांवर सेंड टू कोर्ट केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत.

नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन त्यांच्यावर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे आवाहनही श्री. बांगर यांनी केले आहे.