October 3, 2024

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, 28 जून 2023: मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ३ ते ४ सहकारी गृहनिर्माण संस्थेत २४ व २५ जून रोजी विशेष शिबीरे घेण्यात आली असून त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शिबीरात नवीन मतदार नोंदणी अर्ज नमुना क्रमांक ६ चे १ हजार ४८, मतदार यादीतील नाव कमी करण्याचे नमुना क्रमांक ७ चे ९३ तर नमुना क्रमांक ८ चे ६२२ असे एकूण १ हजार ७६३ अर्ज संबंधित सहकारी गृहनिमार्ण संस्थेतून कार्यवाहीसाठी प्राप्त झाले आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येत आहे. मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडुन योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे.

१ जानेवारी २०२३ रोजी नोंदणी न केलेले पात्र मतदार आणि १ जानेवारी २०२४ मतदार नोंदणीसाठी संभाव्य पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येईल. एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी वगळणे व मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही मतदार मतदानापासुन वंचित राहू नये यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ आहे अगर कसे याबाबत नागरिकांनी पडताळणी करून घ्यावी.

एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदाराचे नाव समाविष्ट असल्यास त्यांनी एक नाव कायम ठेवून इतर ठिकाणची नावे कमी करण्यासाठी नमुना ७ चा अर्ज भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा. मतदारांचे नाव चुकीने वगळण्यात आले असल्यास त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय येथे नमुना ६ चा अर्ज जमा करावा, असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे.