July 26, 2024

गर्डर उभारण्यासाठी चांदणी चौकातील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित करण्याचा निर्णय

पुणे, 28 जून 2023: चांदणी चौक प्रकल्पाच्या मुख्य पुलाच्या (व्हीओपी) गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर ४ जुलै ते १५ जुलै २०२३ या कालावधीत रात्री ००.३० (सोमवारी रात्री १२.३० पासून) ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्याने नियंत्रित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे सहायक आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या चांदणी चौक प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्यात आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त मल्टी ॲक्सेल वाहनांची वाहतूक ३ तासांसाठी रोखण्यात येणार आहे. ही वाहने योग्य त्या ठिकाणी थांबवली जातील किंवा त्या कालावधीत इत्तर मार्गाचा अवलंब केला जाईल.

या कालावधीमध्ये मुख्य महामार्गावरील (मेन कॅरेजवे) वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील. मुंबईकडून सातारा/ कोथरुडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले सेवा रस्ता व रॅम्प – ६ चा वापर करतील. तसेच सातारा व कोथरुड (पुणे शहर) मार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प- ८ चा वापर करण्यात यावा. इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही. त्यामुळे कुठलीही वाहतूक थांबणार नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक श्री.कदम यांनी दिली.